आडाळी ग्रामपंचायतीचा डिजिटल पुढाकार

‘स्मार्ट अँप’मुळे सेवा एका क्लिकवर
Edited by:
Published on: March 30, 2026 17:52 PM
views 16  views

दोडामार्ग : ग्रामस्थांना पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी आडाळी-फोंडीये ग्रुप ग्रामपंचायतीने एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेल्या ‘स्मार्ट ग्रामपंचायत अँप’चे लोकार्पण जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.

या अँपच्या माध्यमातून विविध दाखले, कर भरणा, तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित तक्रारी नोंदविण्याची सुविधा आता घरबसल्या उपलब्ध झाली आहे. डिजिटल सेवांमुळे ग्रामस्थांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा मिळणार असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार होणार आहे.

प्रमोद कामत म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामपंचायतीने अशा प्रकारे पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब आहे. हा उपक्रम केवळ सोयीसाठी नसून प्रशासनाची जबाबदारीही वाढवणारा आहे. आडाळी ग्रामपंचायतीने राज्यासाठी आदर्श निर्माण केला असून, जिल्हास्तरावर हा मॉडेल राबविण्याचा विचार केला जाईल.”

गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी ग्रामपंचायतीच्या लोकाभिमुख आणि नवोपक्रमशील कामाचे कौतुक करत, “अँपमुळे विकासाचे मॉडेल म्हणून गावाची ओळख निर्माण होत आहे,” असे सांगितले. निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत यांनी अँपच्या माध्यमातून घरबसल्या सेवा मिळत असल्याचा अनुभव सांगत, हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले.

यावेळी सरपंच पराग गांवकर यांनी सांगितले की, “ग्रामस्थांना अधिक गतिमान सेवा देण्यासाठी हे अँप विकसित केले असून, त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. त्याचवेळी ग्रामस्थांनी कर भरणा करून सहकार्य करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे गावाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.”

कार्यक्रमात अँपच्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. तसेच अँपसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या प्रवीण गांवकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, सरपंच पराग गावकर, निवृत्त प्रशासकीय अधीकारी सतीश लळीत, ग्राम विस्तार अधिकारी श्रीरंग जाधव, उपसरपंच विशाखा गांवकर, ग्रामपंचायत अधिकारी नम्रता राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य निशा गावकर, संजना गावकर, अमोल परब, परेश सावंत, लक्ष्मण मेस्त्री व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्यूआर कोडं चे अनावरण करून कामत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आत्माराम गांवकर यांच्या हस्ते कामत यांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्य सावंत, साक्षी तळवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच विशाखा गांवकर, ग्रामपंचायत अधिकारी नम्रता राणे,ग्रामपंचायत सदस्य निशा गांवकर, संजना गांवकर, अमोल परब, परेश सावंत, लक्ष्मण मेस्त्री उपस्थित यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष गवस यांनी केले. 

दोन्ही बाजूने जबाबदारी वाढेल !

सरपंच गांवकर म्हणाले की ग्रामस्थांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हे अँप आम्ही विकसित केले आहे. त्यामुळे अधिक गतिमान सेवा देण्याची जबाबदरी आमची वाढली आहे. त्याचवेळी कर भरणा करून प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून काम करताना ही अभिनव संकल्पना सुचली. त्यामुळे याला अभियानाचे यश मानता येईल. अभियानात सर्व ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नम्रता राणे, कर्मचारी स्मिता सावंत, उदय कदम, रमेश शेळके यांनीही चांगले काम केले .