
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राज्य सरकार 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे अभियान राबविणार आहे. सहभागी ग्रामपंचायतींचे ५९ निकषांवर गुणांकन केले जाईल. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना 'आरोग्यसंपन्न ग्राम' घोषित करण्यात येईल. विजेत्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार ५ कोटी ते २ कोटी रुपयांपर्यंत असणार आहेत. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींनी आपले गाव आरोग्य संपन्न गाव अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केले.
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, महिला व बाल विकास सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण सभापती रुहिता तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकसहभाग घेतला जाणार आहे. १ एप्रिलपासून ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभर हे अभियान राबविले प्रमाण जाईल. या अभियानांतर्गत आजार होऊच नयेत यावर भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे कमी करणे, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण यांचा समावेश अभियानात आहे. याचे मूल्यमापन एप्रिल २०२७ नंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींनी आपले गाव आरोग्य संपन्न गाव अभियाना सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केले.
लोकसहभागातून अभियान
'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियान लोकसहभागातून राबविले जाणार आहे. ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी हा उपक्रम आहे.
अभियानाचा मुख्य उद्देश
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अभियान राबविले जात आहे.
विविध स्तरांवर पुरस्कार
तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर विविध निकषांनुसार गावांचे मूल्यमापन होऊन स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार दिला जाईल.
बहुस्तरीय समित्यांची स्थापना होणार
प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन केल्या जातील.
५९ निकषांवर गुणांकन
पुरस्कारासाठी विविध ५९ आरोग्यविषयक निकषांच्या आधारे संबंधित समित्यांकडून गावांचे मूल्यमापन व गुणांकन केले जाईल. १०० गुणांचे गुणांकन केले जाणार आहे.
७० टक्क्यांवर गुण
मूल्यमापनामध्ये ७० टक्क्यांवर गुण मिळविणारी गावे 'आरोग्यसंपन्न ग्राम' जाहीर केली जातील. पुरस्कारास पात्र ठरतील.
कुठे कराल नोंदणी?
या अभियानात भाग घेण्यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी, तालुका आरोग्याधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतींना नोंदणी करता येईल. असेही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्पष्ट केले.











