
कणकवली : युवा बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी सुशांत यांच्याकडेच कामाला असलेला मुकादम अमर कदम याला पोलिसांनी याचा अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली असली तरी हा खून कोणत्या कारणातून झाला, याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सुशांत याचा मृतदेह विच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला होता, त्याचे रिपोर्ट्स येण्यासाठी आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येण्यासाठीही काही दिवस लागणार आहेत.
हे दोन्ही रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच सुशांत यांच्यावर नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या, हे स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या बाजूला सुशांत यांच्या पायातील चपलांपैकी एक चप्पल चक्क घटनास्थळावरील झाडावर आढळली होती. ही चप्पल झाडावर नेमकी कशी गेली हा देखील प्रश्न पोलिसांसह सर्वांनाच पडला आहे. संशयीत अमर कदम याने अनानवधाने सुशांत यांच्यावर गोळी झाडली, असे पोलिसांचा प्राथमिक तपास सांगत असला तरीही या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा, अशी मागणी सर्वांकडूनच होत आहे.











