LIVE UPDATES

डीजे आवाजाचे आणि वेळेच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 13:24 PM
views 47  views

कणकवली : कोकणातील सर्वात मोठा सण हा गणेशोत्सव असतो. या सणानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हयाच्या लोकसंख्येच्या सुमारे दीडपट जादा गणेशभक्त दाखल होतात. याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो. म्हणूनच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या नियोजनाला सर्वांनी सहकार्य करावे. डीजे, ध्वनी व्यावसायिकांनी वेळेचे व आवाजाचे बंधन पाळावे. गणेश मंडळांनी अनुचित काही घडणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी येथे केले.

कणकवली पोलीस ठाण्याच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील, व्यापारी, संघटनांचे प्रतिनिधी, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी कणकवली पोलीस ठाण्यातर्फे घेण्यात आली. यावेळी नयोमी साटम यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव उपस्थित होते. साटम यांनी उपस्थितांच्या समस्या, प्रश्न, सूचना ऐकून घेतल्या. व्यापारी संघटनेचे दीपक बेलवलकर, फळे, भाजी-फुले विक्रेता संघटनेचे अनिल हळदिवे यांनी पार्किंगबाबत बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्या. कासार्डे येथे मोकाट गुरांमुळे अपघात होत असल्याची समस्या मांडण्यात आली. वारगाव येथे धाब्याच्या ठिकाणी मोठे कंटेनर थांबतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, याकडे लक्ष वेधण्यात आले.

साटम म्हणाल्या, सिंधुदुर्गची लोकसंख्या सुमारे आठ लाखांहून अधिक आहे. तर गणेशोत्सवात बाहेरून सुमारे चार लाख गणेश भक्त दाखल होतात. त्यांचा ताण पोलिस, महावितरण, रस्ते, आरोग्य आदी सर्वच यंत्रणावर येतो. याच ताणाचा परिणाम या यंत्रणांवर येऊ नये यासाठीच नियोजन करण्यात येत आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा. एका चालकाच्या बेशिस्तपणामुळे अनेकजण बाधित होत असतील तर असे वाहन टो करून ते पोलीस ठाण्यात अथवा मोकळ्या जागेत ठेवा अशा सूचना साटम यांनी पोलिसांना दिल्या

गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था, सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घेण्यात यावी. गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता, व्यावसायिकांनी आपली सीसीटीव्ही यंत्रणा तपासून सक्षम करावी. डिजे व्यावसायिकांनी वेळेचे बंधन पाळावे. वाद्यस्त गाणी लावून नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही साटम यांनी दिला.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी एक कर्मचारी समन्वयक तैनात ठेवावा, अशा सूचना साटम यांनी दिल्या. रस्त्यांचे खड्डे भरण्याबाबत पीडब्ल्यूडीला सूचना करा. विसर्जन मार्गावर विजेच्या तारा खाली असतील, तर त्या सुरळीत करण्याबाबत महावितरणला कळवा. अग्नीशमन यंत्रणेचा आढावा घ्या, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. गणेशभक्तांनी गणेश आगमन व विसर्जनप्रसंगीं फटाके लावताना दक्षता घ्यावी. पोलीस पाटलांनी गावात अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही साटम यांनी केले.

पोलीस पाटील, महिलांनी नयोमी साटम यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीस पाटलांनी कमलेश बच्छाव यांचे स्वागत केले. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पता आभार मानले.