सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांसाठी सुवर्णसंधी

ब्राझीलच्या धर्तीवर प्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2026 18:54 PM
views 28  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्यातील 'काजू महोत्सवा'ला भेट दिली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले. ब्राझीलमध्ये ज्या प्रकारे काजू बोंडापासून विविध पदार्थ बनवले जातात, त्याच धर्तीवर कोकणातही प्रकल्प उभारण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.


केसरकर म्हणाले की, "आतापर्यंत आपण फक्त काजूच्या बीचा (काजूगर) विचार करत होतो आणि बोंड फेकून देत होतो. मात्र, ब्राझीलमध्ये या काजू बोंडापासून मोठ्या प्रमाणावर 'आर्टिफिशियल मीट' तयार केले जाते. तसेच तेथे 'कॅश्यूरिटा' आणि 'कॅश्यू फॅन्टा' यांसारखे ब्रँडेड ज्यूस लोकप्रिय आहेत. आपल्याकडेही अशा उत्पादनांना मोठी संधी आहे. काजू ज्यूसच्या गुणधर्मांविषयी सांगताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. काजूच्या रसात संत्र्याच्या रसापेक्षा सहा पटीने जास्त व्हिटॅमिन-सी असते. या नैसर्गिक गुणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय काजू रसाला मोठी मागणी मिळू शकते. जर काजूच्या बोंडाला योग्य किंमत मिळाली, तर शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च त्यातूनच निघू शकेल आणि काजूगराचे उत्पन्न हा त्यांचा निव्वळ नफा ठरेल. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, तसेच शास्त्रज्ञांसोबत त्यांनी ब्राझीलचा दौरा केला होता. लवकरच याचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. काजूच्या झाडाला मोहोर येण्याच्या काळात पाणी दिल्यास उत्पादनात दीडपट वाढ होऊ शकते. यामुळे बाहेरील देशांतून काजू आयात करण्याची गरज उरणार नाही. तसेच गोव्यात झालेल्या या महोत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि मार्केटिंगचा हा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगितले.