'आम्ही साहित्यप्रेमी'तर्फे ’जंगलांचे डॉक्टर’ मिलिंद पाटील यांच्याशी गप्पा

Edited by:
Published on: December 24, 2025 11:46 AM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी  :  ‘आम्ही साहित्यप्रेमी'च्या डिसेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पर्यावरण पुनरुज्जीवन क्षेत्रात संशोधन करणारे ‘जंगलाचे डॉक्टर’ मिलिंद पाटील यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग दहावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. 

श्री. मिलिंद पाटील  ’पर्यावरणीय पुनरूज्जीवन‘ या क्षेत्रात काम करतात. पर्यावरणीय पुनरुज्जीवन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ज्याप्रमाणे एखाद्या आजारी माणसाला बरे करण्यासाठी आपण उपचार करतो, अगदी तसेच निसर्गावर केलेले उपचार आहेत. मानवी हस्तक्षेप किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या जंगलांचा किंवा परिसंस्थांचा ऱ्हास झाला आहे, त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत आणणे म्हणजे पुनरुज्जीवन. वनशास्त्र तज्ज्ञ आणि निसर्ग संवर्धन संशोधक असलेले मिलिंद पाटील हे गेल्या १० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे तज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण वनशास्त्रात झाले असून ते सध्या पर्यावरण शास्त्रात पीएचडी करत आहेत. त्यांनी फुलपाखरांचे स्थलांतर, हत्तींचा वावर आणि माणूस-वन्यजीव संघर्ष यांसारख्या विषयांवर सखोल अभ्यास केला आहे. या वेगळ्या विषयावर साहित्यरसिकांशी सोप्या भाषेत गप्पा करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.