
मालवण : आचरा समुद्रकिनारी २०१६ साली झालेल्या ऐतिहासिक पारंपरिक मच्छीमार आंदोलनातील सर्व ९३ आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने काल निर्दोष मुक्तता केली. तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिल्याने जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
३० ऑक्टोबर २०१६ रोजी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारीच्या विरोधात श्रमिक मच्छीमार संघ आणि आचरा बंदर मच्छीमार संघटनेने मत्स्य विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान दोन गटांत मोठा संघर्ष झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पारंपरिक मच्छीमारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा यांसह मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलनाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली होती आणि त्यानंतर मासेमारी कायद्यात मोठे बदल करण्यात आले होते.
ओरोस जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी गेली १० वर्षे सुरू होती. या खटल्यात मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह ९३ जणांवर आरोप होते. येथील ज्येष्ठ वकील ॲड. उल्हास कुलकर्णी यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांना ॲड. प्राची कुलकर्णी, ॲड. अमेय कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व ९३ आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
निकालांनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. उल्हास कुलकर्णी म्हणाले की, "गेल्या १० वर्षांपासून हा लढा सुरू होता. पारंपरिक मच्छीमारांनी आपल्या हक्कासाठी हे आंदोलन केले होते. आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या कष्टकरी मच्छीमारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. या निकालाचे स्वागत करत श्रमिक मच्छीमार संघ आणि जिल्ह्यातील सर्व संघटनांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.











