LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील २९ ज्येष्ठ चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

प्रवासी वाहतूक चालकांसाठी कल्याणकारी योजनांचा आधार ; ३४३ चालकांची सभासद नोंदणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 07, 2026 20:06 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी : प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत चालकांना सामाजिक सुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामार्फत ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून चालकांसाठी जीवनविमा, अपघात विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास आर्थिक मदत, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्यवृद्धी यांसह विविध योजना राबविण्यात येत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मंडळाच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३४३ चालकांची सभासद नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १७२ अर्ज मंजूर झाले असून, विशेष म्हणजे सध्या एकही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

२९ ज्येष्ठ चालकांचा होणार सन्मान

प्रवासी वाहतूक क्षेत्रात अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ चालकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मंडळामार्फत सन्मान निधी देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ ज्येष्ठ चालक सन्मान निधीसाठी पात्र ठरले असून, प्रत्येक पात्र चालकास १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येणार आहे.

प्रवासी वाहतूक चालकांना अनेकदा अनियमित कामाचे स्वरूप, अपघाताचा धोका आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाच्या या कल्याणकारी योजनांमुळे चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पात्र ऑटो-रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाचे सभासदत्व स्वीकारून उपलब्ध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे. ‘मंडळाशी जोडा – कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या’ या उद्देशाने जिल्ह्यातील पात्र प्रवासी वाहतूक चालकांनी मोठ्या संख्येने सभासदत्व स्वीकारावे, असेही आवाहन परिवहन विभागाने केले आहे.