
देवगड : देशाच्या भवितव्यासाठी विद्यार्थी आणि तरुण-तरुणींनी विज्ञानाची कास धरून प्रत्येक गोष्टीमागे ‘का?’ आणि ‘असं का?’ असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. जपान, जर्मनी, अमेरिका यांसारखे देश महासत्ता होत असताना त्यांच्या नागरिकांनी प्रत्येक विषयावर प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जागृत ठेवले. प्रश्न विचारण्याची ही वृत्ती भारताला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाईल, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
सुनिता शांताराम ट्रस्ट आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर २००८ पासून साजरा होणाऱ्या विश्व हेलियम डेचा १८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ला अशी भव्य विज्ञान रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये जामसंडे येथील मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज, दीक्षित फाउंडेशनमधील विद्यार्थिनी, विजयदुर्ग हायस्कूल, विजयदुर्ग उर्दू हायस्कूल तसेच विजयदुर्ग प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली ही रॅली किल्ल्यातील साहेबांच्या ओट्यापर्यंत पोहोचली. हेलियम नामफलकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या घोषणांनी किल्ल्याचा परिसर विज्ञानमय झाला.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग येथील आंग्रे आरमार केंद्राचे काम प्रगतिपथावर असून त्यासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, आंग्रे आरमार आणि खगोलशास्त्राचा इतिहास पर्यटकांना अनुभवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक राजेंद्र परुळेकर यांनी २००८ मध्ये पाहिलेले स्वप्न आता साकार होत असल्याचे सांगितले. मराठा आरमाराची महती सांगणारे भव्य संग्रहालय विजयदुर्गात उभे राहत असून भविष्यात येथे लाईट अँड साऊंड शो सुरू झाल्यास पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. सुनील आठवले यांनी हेलियम वायूची निर्मिती आणि त्याचा वैज्ञानिक प्रवास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. अहमदाबाद येथील विज्ञान-इस्रो केंद्रांच्या धर्तीवर विजयदुर्ग परिसराला ‘हेलियम परिसर’ म्हणून ओळख मिळावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. विजयदुर्ग हा ऐतिहासिक किल्ल्यासोबतच भविष्यात विज्ञान पर्यटनाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विज्ञानप्रेमी पवन परुळेकर, माजी सरपंच प्रसाद देवधर, विद्यमान सरपंच रियाज काळजी यांनी मनोगत व्यक्त केले. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, विकी तोरसकर यांच्यासह सौ. निरजा जठार, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोस्कर, सुप्रिया आळवे, चंद्रहास उर्फ बबलू सावंत, ग्रामपंचायत सदस्य लतिका गिरकर, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, दिनेश जावकर, प्रदीप साखरकर, पोलीस पाटील राकेश पाटील आदी उपस्थित होते.










