LIVE UPDATES

कुडाळात ‘सेवा संकल्प’ व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

नगरपंचायतीचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 15:26 PM
views 58  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने गणेश घाट, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ या संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका मांजरेकर आणि कुडाळचे मुख्याधिकारी पवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष,  सीईओ व नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसराच्या स्वच्छतेची शपथ घेतली. यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपक्रमाचा भाग म्हणून भारत देशाच्या नकाशाचा आराखडा तयार करून त्यावर कर्मचारी व उपस्थितांनी उभे राहून ‘मनुष्यरुपी रांगोळी’ साकारली. ही मानवी रांगोळी उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

त्यानंतर जिल्हाधिकारी, कुडाळचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गणेश घाट परिसराची प्रत्यक्ष स्वच्छता केली. या संयुक्त उपक्रमांतर्गत 'स्वच्छता ही सेवा अभियान' हे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत, तर 'सेवा संकल्प अभियान' १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवले जाणार आहे. कुडाळ शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.