LIVE UPDATES

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभागी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 13:51 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छता व्यवस्थापनात केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी, शाश्वत देखभाल आणि त्यातून साध्य होणाऱ्या परिणामांचे प्रभावी मूल्यांकन हेच प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित आर्थिक क्षमता, पर्यटनामुळे वाढणारी तरंगती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारे कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे आव्हान लक्षात घेता, स्थानिक गरजांवर आधारित लवचिक व शाश्वत स्वच्छता व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे झालेल्या १० व्या आयएससी-एफआयसीसीआय सॅनीटेशन अवॉर्ड्स सिरेमनी आणि इंडीया सॅनिटेशन कॉनक्लेव २०२६ मधील ‘अनलॉकिंग वॉश इंपॅक्ट थ्रू पार्टनरशिप्स’ या परिसंवादात त्या मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सहभागी झाल्या होत्या. 

त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता व्यवस्थापनातील आर्थिक अडचणी अधोरेखित करताना सांगितले की, ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक संस्थांवर सोपविण्यात आली असली, तरी ग्रामपंचायती आणि छोट्या नगरपालिकांची आर्थिक क्षमता अद्याप मर्यादित आहे. स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशनसारख्या योजनांत केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असला, तरी पायाभूत सुविधांची देखभाल व दुरुस्तीचा खर्च स्थानिक संस्थांसाठी आव्हानात्मक ठरतो. त्यामुळे स्थानिक गरजांनुसार स्वतंत्र व शाश्वत आर्थिक मॉडेल विकसित करण्याची आवश्यकता आहे.

पर्यटनामुळे सिंधुदुर्गात स्थिर लोकसंख्येपेक्षा मोठी तरंगती लोकसंख्या निर्माण होत असल्याने कचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर पारंपरिक घनकचऱ्यासोबतच प्लॅस्टिक व ई-कचऱ्याचे उगमस्थानी व्यवस्थापन, विस्तारित उत्पादक जबाबदारीची EPR काटेकोर अंमलबजावणी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर देणे गरजेचे आहे. स्थानिक गरजांवर आधारित ‘Bottom-up’ दृष्टिकोन स्वीकारून स्टार्टअप्स, खासगी क्षेत्र व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून स्वच्छता व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था उभी करावी, 

तसेच अशा भागीदारीचा खर्च व परिणामकारकता तपासण्यासाठी प्रभाव मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयएससी येणाऱ्या कालावधीत काम करणार आहे. 

या परिसंवादाच्या पॅनेलमध्ये आयएससीच्या अध्यक्ष नैना लाल किडवाई, स्वच्छ भारत मिशनच्या संचालक सुरभी मलिक, भारत सरकारच्या पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाच्या उपसचिव अँजल भाटी चौहान, जम्मू-काश्मीर शासनाचे विशेष सचिव नरिंदर खजुरिया, कोहलेर कंपनीच्या प्रादेशिक सोशल इम्पॅक्ट मैनेजर ऋषिका जयस्वाल, साहस झिरो वेस्टच्या सीइओ शोभा राघवन आणि एचएसबीसीचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट रोमित सेन यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सहभागी झाल्या. 

सूत्रसंचालन आयटीसी लिमिटेडचे कार्यकारी व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रमुख – सोशल इनव्हेस्टमेंट्स प्रभाकर लिंगारेड्डी यांनी केले. या वेळी वॉश क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना सॅनीटेशन अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले.