LIVE UPDATES

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

महिला व बाल रुग्णालयात ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 15:07 PM
views 19  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या अपत्यावरही होतो. त्यामुळे तरुणींनी जंक फूड टाळून सकस पोषणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

 चांगल्या व योग्य पोषण आहारामुळे सर्व प्रकारचे आजार दूर ठेवता येतात; आपण सर्वांनी मिळून ‘ॲनिमिया मुक्त भारत’ हा संकल्प प्रत्यक्षात आणूया आणि सकस आहारातून ॲनिमियावर मात करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत आयोजित पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी महिला व तरुणींना योग्य पोषण आणि ॲनिमिया प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक सकस अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळांचे सेवन किती गरजेचे आहे, हे तज्ज्ञांनी पटवून दिले. विशेष म्हणजे, पोषण आहाराचे प्रत्यक्ष महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमात विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्सही उभारण्यात आले होते.

या जनजागृती कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

व्यासपीठावर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके, रुग्ण कल्याण समिती सदस्या रश्मी नाईक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीतम जगताप यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांनी मानले.