सावर्डे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी इंगळे व प्रगती बुदरने पटकावला प्रथम क्रमांक
Edited by: मनोज पवार
Published on: July 11, 2025 16:20 PM
views 27  views

सावर्डे : भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य ही परंपरा महान आहे. या परंपरेत वयाचे बंधन नाही. मानवाच्या जीवनात अनेक जण गुरू म्हणून सहवास करत असतात यामध्ये आपले आई-वडील, शिक्षक व निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या गुरुस्थानी असतो. गुरु व शिष्यांच्या बाबतीत विविध ऐतिहासिक उदाहरणे देऊन, इतरांचा आदर करा व पर्यावरणाचे संवर्धन करा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा  मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सचित्र भिंतीपत्रक तयार केले होते. याचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक भानुदास चव्हाण यांच्या हस्ते झाले. 

विद्यार्थ्यांमध्ये वकृत्वकलेला प्रोत्साहन देण्यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सदर स्पर्धा लहान गट पाचवी ते सातवी व मोठा गट आठवी ते दहावी याप्रमाणे आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम क्रमांक सिद्धी अंकुश इंगळे (६वी ब), द्वितीय क्रमांक आरोही मोहन चव्हाण (६वी ब), तृतीय क्रमांक सार्थ प्रदीप जाधव (६वी ब) यांनी पटकावले.

तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्रगती मंगेश बुदर (८वी ब), द्वितीय क्रमांक स्वरा मिलिंद टक्के (९वी ब), तृतीय क्रमांक कृपा प्रदीप देडगे (८वी ब) यांना मिळाले. विशेष भाषण सत्रामध्ये पूर्वा संतोष साळुंखे (हिंदी), निधी रमेश भडवळकर (इंग्रजी) व साक्षी एकनाथ गोरे (मराठी) यांनी प्रभावी भाषणे केली.कार्यक्रमात प्रार्थना, पसायदान, गुरुमहत्त्वावरील सादरीकरण यामुळे वातावरण भारावून गेले. विशेष बाब म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे निवेदन, स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले. सकाळ सत्रात निवेदन कोमल सावंत (७वी क) व आभार धनश्री गायकवाड (७वी क) हिने केले. दुपार सत्रात दीप्ती लिबे (९वी ब), संस्कृती घाग (१०वी क) यांनी स्वागत व निवेदन केले, तर कोमल पंडित (१०वी क) हिने आभार मानले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. शिक्षकांचा सत्कार देखील वर्ग प्रतिनिधींनी केला.या कार्यक्रमामुळे गुरु-शिष्य परंपरेचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनात ठसले आणि त्यांनी गुरूप्रती आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भित्तिपत्रकाचे उद्घाटन करताना ज्येष्ठ शिक्षक भानुदास चव्हाण विद्यार्थी व मान्यवर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य राजेंद्र वारे