कोकण रेल्वेत भरती..!

प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांना संधी
Edited by:
Published on: August 19, 2024 06:15 AM
views 733  views

मडगाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून कोकण रेल्वेतील १९० पदांच्या भरतीची जाहिरात काढलेली आहे. यात इलेक्ट्रिकल, सिव्हील, मेकॅनिकल, ऑपरेटिंग, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, कमर्शिअल या शाखांमधील पदे आहेत. ६ ऑक्टोबर २०२४पर्यंत या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत असून रेल्वे प्रकल्पांसाठी जमीन गेलेल्या कुटुंबियांतील व्यक्तीला या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी लवकरच कोकण रेल्वेकडून १९० पदांसाठी जाहिरात काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दुसर्‍याच दिवशी पदभरतीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. या पदांच्या भरतीसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज सादर करता येणार असून ६ ऑक्टोबर ही अर्ज सादरीकरण व आवश्यक ती फी अदा करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे. या भरतीत इलेक्ट्रीकल विभागातील सिनिअर सेक्शन इंजिनिअर ५, टेक्निशिअन व असिस्टंट लोको पायलटच्या प्रत्येकी १५ जागा, सिव्हील विभागातील सिनिअर सेक्शन इंजिनिअर ५, ट्रॅक मेंटेनर ३५ जागा, मेकॅनिकल विभागातील टेक्निशिअनच्या २० जागा, ऑपरेटिंग विभागात स्टेशन मास्टर १०, गुडस ट्रेन मॅनेजर ५, पॉईंटमन ६० जागा आहेत. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागात १५ जागा व कमर्शिअल विभागात सुपरवायझरच्या ५ जागा भरायच्या आहेत. या भरतीसाठी १८ ते ३‍६ वर्षांची मर्यादा असून जातीनिहाय त्यात सूट देण्यात आलेली आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांना संधी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून रेल्वेच्या प्रकल्पांसाठी ज्या जमीनमालकांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील रोहा ते ठोकुरपर्यंतच्या विभागातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य असणार आहे. प्रकल्पग्रस्त जमीन मालक तसेच पत्नी, मुले तसेच नातवंडांनाही अर्ज करता येणार आहेत.

भरतीसाठी तीन याद्या

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना या भरतीत प्राधान्य असल्याने गोव्यातील ज्या जमीन मालकांच्या जमिनी कोकण रेल्वेने रेल्वे ट्रॅक उभारण्यासाठी किंवा इतर कामांसाठी संपादित केल्या. त्यांनाही शैक्षणिक अर्हतेनुसार भरतीत सहभागी होता येणार आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांची पहिली, त्यानंतर रोजगार विनियम खात्याकडे नोंदणी केलेल्यांची दुसरी व महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील रहिवासी दाखला असलेल्यांची तिसरी अशा याद्या तयार केल्या जाणार आहेत.

दलालांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

कोकण रेल्वेकडून भरती प्रक्रिया केली जात असताना केवळ कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिरातीनुसार अर्ज करावा. कोणत्याही एजंटच्या भूलथापांना बळी पडू नका. कोकण रेल्वेकडून कोणत्याही एजंटना नेमण्यात आलेले नाही. असा प्रकार आढळल्यास कोकण रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.