सीआयएसएफ'मध्ये तब्बल 70 हजार जागांसाठी बंपर भरती

सैनिकांच्या जागा भरणार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 05, 2025 12:56 PM
views 25  views

CISF भरती: देशात सध्या काही महत्वाच्या खात्यात भरतीचे वारे वाहत असून सीआयएसएफमध्येही जेम्बो भरती होणार आहे. गृहमंत्रालयाने या भरतीला मंजुरी दिली असून पाच दहा हजार नव्हे तर तब्बल 70 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही नामी संधी चालून आली आहे.

नोकरीची संधी एकप्रकारे तरुणांसाठी गिफ्टच असून त्यांना कुटुंब आणि देशाचे उत्थान करण्याची, देशसेवा करुन या संधीचे सोने करता येणार आहे. त्यामुळे आतापासूनच भरतीची तयारी करण्यास हरकत नाही, खास करुन मैदानी चाचणीची तयारी यात महत्वाची ठरते.

सीआयएसएफ वाढवणार सुरक्षा दलातील ताकद- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) येत्या पाच वर्षांत ७० हजार सैनिकांची भरती करण्यास गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. CISF ची सध्याची कुमक 1.62 लाख आहे, ती वाढून 2.20 लाख करण्याचे लक्ष्य देखील ठेवण्यात आले आहे. या भरती मोहिमेमुळे देशाच्या औद्योगिक रचनेला नवीन बळकटी मिळेल आणि तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची सुवर्णसंधी मिळेल. हे पाऊल केवळ औद्योगिक क्षेत्रांची सुरक्षा वाढवेलच असे नाही तर सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरेल.

5 वर्षात भरणार पदं, दरवर्षी अशी असेल भरती- वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, CISF ने म्हटले आहे की, दरवर्षी सरासरी १४ हजारांहून अधिक पदांवर भरती केली जाईल. २०२४ मध्ये, सीआयएसएफने १३ हजार २३० सैनिकांची भरती केली, तर २०२५ साठी २४ हजार ९८ पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. ही भरती मोहीम पुढील पाच वर्षे सतत सुरू राहील, ज्यामध्ये महिलांनाही अधिक संधी दिल्या जातील.

औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा वाढेल नक्षलवाद कमी झाल्यानंतर छत्तीसगडसारख्या राज्यात नवीन औद्योगिक केंद्रे स्थापन होण्याची अपेक्षा आहे. गृह मंत्रालयाने मार्च २०२६ पर्यंत माओवादी कारवाया संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा परिस्थितीत, सीआयएसएफची अतिरिक्त तैनाती या भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करेल.

सीआयएसएफ येत्या काळात एक नवीन बटालियन देखील तयार करेल. नव्याने भरती झालेल्या सैनिकांना जम्मू-काश्मीरमधील विमानतळ, समुद्री बंदरे, औष्णिक वीज प्रकल्प, अणु प्रतिष्ठाने, जलविद्युत प्रकल्प आणि तुरुंग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जाईल.