सावंतवाडी : आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स हा उद्योगसमूह पहिल्या टप्प्यातील यशस्वीतेनंतर आता पुढचं पाऊल टाकत आहेत. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व माजी मंत्री दीपक केसरकर, आम. निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपुर्णा कोरगावकर व प्रोप्रा. ऐश्वर्या शेट कोरगावकर यांनी केल आहे.
माजगाव येथे अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्सच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उद्या सोमवारी सायं. ४ वा. करण्यात येणार आहे. मंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आम. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास असणार आहे. तसेच डेरिक पर्किन्स, हेंसल डॉब्स डेव्हिड क्लेमन्स हे गोसोर्सचे प्रमुख अतिथी यूएसएहून खास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपुर्णा कोरगावकर यांनी केल आहे. याप्रसंगी प्रोप्रा. ऐश्वर्या शेट कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, भिकाजी कानसे, अँड. पुष्पलता कोरगावकर, श्रीरंग मंजूनाथ आचार्य, प्रसाद कोरगावकर, व्यंकटेश शेट आदी उपस्थित होते.
यावेळी अन्नपुर्णा कोरगावकर म्हणाल्या, गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांची सेवा करत असताना गो सोर्स सोबत अन्नपुर्णा टेक सोर्सन ४५ स्टाफसह ही आयटी कंपनी सुरू केली. आपल्याकडील स्थानिक भूमिपुत्र युवकांना रोजगार मिळावा या हेतूने हे पाऊल आम्ही टाकलं होतं. याला मिळणारा प्रतिसाद बघता दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ उद्या करत आहोत. यामुळे अजून ६० जणांना या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. युएसए मधून गो सोर्सचे प्रमुख अतिथी देखील उपस्थित राहणार आहेत. आम्ही इथल्या मुलांना रोजगार देऊ शकतोय याचा आनंद वाटत आहे अशी भावना सौ. कोरगावकर यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणारे संतोष कानसे, माजी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
प्रोप्रा. ऐश्वर्या शेट कोरगावकर म्हणाल्या, आई- वडील व संतोष कानसे यांच्या सहकार्याने पहिला प्रोजेक्ट यशस्वी करून दुसऱ्या टप्प्यास आम्ही सुरूवात करत आहोत. पदवीधर मुलांना आम्ही ट्रेनिंग देऊन येथे संधी देत आहोत. इंग्रजी भाषेच ज्ञान असणं आवश्यक असल्याने व स्थानिक युवकांनी सर्व भाषांत निपुण असावं यासाठीही आमचा प्रयत्न आहे. आपल्याकडचे अनेक युवक-युवती हेच काम करण्यासाठी मुंबई, पुण्यात जातात. त्यांना आमच्याद्वारे जन्मभूमीतच संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे असं मत सौ. ऐश्वर्या शेट कोरगावकर यांनी व्यक्त केले.