बालसाहित्यिक असल्याचा सार्थ अभिमान : पद्मा फातर्पेकर

...तर वृद्धाश्रम वाढवावेच लागणार ! *'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!*
Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2024 13:17 PM
views 312  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष सदर आम्ही घेतोय. याच्या पंचवीसाव्या पुष्पात ज्येष्ठ साहित्यिका, कवी, शिक्षिका तथा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्ःमय निर्मिती पुरस्कार प्राप्त पद्मा फातर्पेकर (मंदा परूळेकर) यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. 

पद्मा फातर्पेकर (मंदा परूळेकर), मुलाखत

पुष्प : २५ वं.

तुमच्या लेखनाची सुरूवात कशी झाली ?

साहित्याकडे वळले कारण घरात जेवण, आरोग्याच्या दृष्टीने जशी सक्ती होती तशी वाचनाचीही होती. त्याच्यासाठी मुबलक साहित्य वडीलांकडून पुरवलं जायचं. बाहेरगावी गेल्यानंतर पुस्तक आणली जायची. साने गुरुजींची, ऐतिहासिक गोष्टी अशी पुस्तकं आमच्यासाठी आणली जायची. ती वाचली जातात की नाही ? हे देखील पाहिलं जायचं. तेव्हा 'आनंद' हे मासिक सातत्याने यायचं. या मासिकात गोष्टी, कथा, सुविचार असायचे. वडील पहाटे वाचनाला वेळ देत. कथा, कादंबरी वाचन आई देखील करायची. त्यावर चर्चा देखील व्हायची. घरातलं वातावरणच त्या प्रकारचं होत. सगळ्या भावंडांच्या हातात पुस्तक दिसायचं. लग्नानंतर पती फातर्पेकर सरांना वाचनासह नाटकाची आवड अधिक होती. त्यांच्यामुळे नाटकांची पुस्तक वाचायला मिळाली. संवाद कसा साधावा हे नाटकातून मला कळालं. माझं मनोगत किंवा माझी कथा लेखनापेक्षा संवादातून जे काही साधता येत ते खूप चांगल आहे असा मला विश्वास होता. तरीसुद्धा मुलं मोठी होईपर्यंत लिहीण्याचा प्रयत्न केला नव्हता. पाठापुरत, व्याख्यान अथवा शाळेत मुलांच्या कार्यक्रमापुरता माझा भाग होता. परंतू, तेव्हा लक्षात आलं की मुलांना काहीतरी पाहिजे आहे. मुलांना स्टेजवर वावरायला द्यायचं असेल तर समाजातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात हे लक्षात आलं. मला स्वतःला झाड, झुडूप, पशूपक्षी यांची आवड असल्यानं माझ्या एकांकिकामध्ये हे चित्र जास्त आल्याचं अनेकजण सांगतात. मी शिक्षिका झाले त्यामुळे मुलं माझ्यासमोर आली. त्या मुलांसाठी मी लिहीती झाले. त्या मुलांचे विचार, त्यांची वागणूक, त्यांच बोलणं हे मला जाणवलं. ते एकांकिकांच्या माध्यमातून मी समोर आणलं. आतापर्यंत तेरा ते चौदा एकांकिका मी लिहिल्या. मुलांना व्यासपीठ मिळवून दिल. माझा विषय विज्ञान असला तरी मराठी साहित्याची आवड मला अधिक होती‌. त्यामुळे लेखनाच काम कुटुंबात माझ्याकडून अधिक झालं. 

शिक्षिका असल्यामुळे बालसाहित्याची अधिक ओढ होती का ?

शिक्षिका असल्यामुळेच बालसाहित्य लिहू शकले. माझा संपर्क सतत मुलांशी असायचा. नोकरी करताना माझ्या शिक्षकांकडून मला मिळाल त्यापेक्षा अधिक मुलांना देण्याचा माझा नेहमी प्रयत्न होता. कारण, माझ्या काळात मुबलक साहित्य होत. त्यामुळे मुलांना वाचन संस्कृतीकडे वळविण्यासाठी माझा अधिक भर होता‌. नवनवीन संकल्पना राबविताना सुक्ष्म अभ्यासक्रमाच्या आधारे मुलांपर्यंत पोहचलो. त्यात मी ज्या शाळेत नोकरीला होते त्या शाळेत मी शिकले, माझी मुलं त्याच शाळेत होती. तिनं पिढ्यांचे ऋणानुबंध माझ्या शाळेशी होते. त्यामुळे माझ्या शाळेसाठी, माझ्या शाळेतील मुलांसाठी काहीतरी करायला हवं हे मला जाणवल. मुलांना शिक्षा देण्याच काम शिक्षकांच नाही. तर मुलांच्या आवडीच्या प्रांताप्रमाणे त्यांचे मुलभूत गुण ओळखून ज्ञानदान करण आवश्यक आहे. यातूनच माझा पहिला 'ऐलमा, पैलमा गणेशदेवा' हा एकांकिका संग्रह प्रकाशित झाला. मी व माझ्या पतींनी मिळून लहान मुलांची एकांकिका बसविली. या एकांकिकेला खूप बक्षिसं मिळाली. शंभरहून अधिक मुलांनी आमच्या एकांकिकेत काम केलं. बक्षीस मिळवण्यासाठी लेखन केल‌ नाही. तर मुलांना काय पाहिजे ? हे लक्षात घेऊन लेखन केलं. मुल खूष रहावी या भावनेतून लिखाण केलं. नाटक, एकांकिका बसविल्या. माझा परिसर मुलांचा असल्याने व मार्गदर्शन फातर्पेकर सर असल्याने आवडीच्या विषयाकडे मी वळले.


आजकाल बालसाहित्य कमी प्रमाणात लिहिलं जात अस वाटत का ? 

माणसाचं आयुष्य पटकन बदललं. ते बदलत असताना  तत्व, सत्व, पारंपरिक गोष्टी टिकवल्या पाहिजेत असा विचार प्रत्येकान केला नाही. ते टिकाव म्हणून आपण शिक्षण घेतो, आपल्याकडे ते संस्कार येतात, आपली ती जबाबदारी आहे. याबाबत सध्याचा पालकवर्ग बराचसा साशंक आहे. त्यांच्या ते लक्षात येत नाही आहे. आमच्यासारख्या वृद्धांवर वृद्धाश्रमात जाण्याची पाळी आली आहे त्याची सुरुवात इथून होते. येत्या काळात हे तर १०० टक्केच होईल. घरदार असून माणसाजवळ माणसंच नसतील तर रहायचं कसं. आई वडिलांकडून आलेले संस्कार, परंपरा जोपासण्याच काम नव्या पिढीच आहे. आज ते होताना दिसत नाही. याच कारण, इंग्रजी माध्यमांची स्कुल वाढली. त्यामुळे मराठी मुलांच शाळेतल्या पुस्तकाशिवाय इतर वाचन होत नाही. पालकांची अवस्था अशी झाली की ते मराठी माध्यमातून शिकलेले मुलं होती इंग्रजी माध्यमात. ही दोन्ही माध्यम सांभाळताना पालकांची कसरत होऊ लागली. त्यामुळे मुलांच वाचन कमी झाल. मुल वाचत नाहीत, पालक पुरवठा करत नाहीत. जर आपण मोबाईल देऊ शकतो तर पुस्तक घेण कठीण नाही. घरात पुस्तक नाहीत तर मुलांना आवड निर्माण होणार कशी ? मुलांन इंग्रजी बोलावं असं वाटतं असताना त्याच्या आई-वडीलांची मातृभाषा त्याच करायचं काय ? यामुळेच मुलांचं वाचन कमी झाल आहे. मुलं मोबाईलवर काय वाचतात ? त्यांना किती लेखक, कवींचा परिचय आहे हा प्रश्न आहे. पण, याला दोषी मुल नाहीत तर आपणच आहोत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याकडे सुद्धा लिहून ठेवलेल साहित्य बरंच आहे. पण, पुस्तक काढण्याचं धाडस होत नाही. कारण, ते वाचलं जातं नाही.

बालसाहित्यिक म्हंटलं तर कमी पणाच वाटत का ?

मला अत्यंत अभिमान वाटतो. पुलंनी म्हटल्याप्रमाणे ''बालसाहित्य लिहीण फार कठीण !''. त्यांच्या या विधानानं मी चढून गेलेले नाही. कथा लिहीताना मला विशेष परिश्रम, अभ्यास करावा लागतो. परंतू, बालसाहित्य लिहिताना माझ्यासमोर असणारा विद्यार्थी हाच जणू विद्यापीठ होत. साहित्याच विश्वच समोर होत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही. बालसाहित्य हा साहित्याचा प्रकार आहे‌. इथूनच खरी सुरूवात होते‌. त्यामुळे अजिबात असं वाटतं नाही की बालसाहित्य आणि कथा, कादंबरी काही वेगळ आहे. ज्याला ज्याला जे-जे जमाव ते त्यांनी करावं. साहित्यात कमी जास्त अस म्हंटलच जावू नये. व्हॉट्सॲप, फेसबुकवर जे साहित्य प्रस्तुत होत त्याला मी साहित्य मानत नाही. ते माणसाच्या अधोगतीचे विचार आहेत जे काही वाचलं जातं ते‌. जे पुस्तक, दिवाळी अंकांच्या रूपानं आल आहे तेच खरं साहित्य आहे. मुलांच्या बाल वयात वाचनाची आवड नसेल तर पुढे त्यांना रूची निर्माण होत नाही. वाचन आपल्याला जगाकडे बघायला शिकवत.


*तुम्ही कथा लेखनही केलं.तुमच्या कथा लेखनाच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे यांची प्रस्तावना लाभली आहे.या विषयी काय सांगाल?*

आसाराम लोमटे यांची भेट अजय कांडर यांच्या माध्यमातून झाली. अजय कांडर, सौ. भागवत यांनी या कथा संग्रहासाठी मला प्रेरीत केलं. माझ्या कथा वाचल्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे यांनी त्याला प्रस्तावना दिली. त्यातील नाव 'उंडी' हे माझं आहे. विद्यार्थ्यांवर आधारीत ते आहे. एक मुलगा मध्यान्य भोजनावेळी आपल्यासमोरच ताट उचलून पळत सुटतो. अन्न टाकल म्हणून शिक्षक त्याला शिक्षेसाठी विचारतात. त्यावेळी तो सांगतो आपण अन्न टाकल नाही. आईवडील कामावर असल्याने घरी दोन भावंड उपाशी आहेत त्यांना ते अन्न भरवून आलो. माझं खाल्लं व एक उंडी त्यांना भरवण माझं कर्तव्य आहे. ही कथा त्यात आहे आणि हे मी पाहिलेलं आहे. हा माझा अनुभव आहे. एका बसस्थानकावर रात्रीच्या वेळी पाहिलेला हा एक प्रसंग आहे. तो प्रसंग मी लिहून ठेवला होता. तो कथेत रुपांतरीत केला‌. माझ्या पोटातून आलेले हे अनुभव आहेत. 


*तुमचे पती प्रा. फातर्पेकर सरांचं लेखनाला किती प्रोत्साहन मिळालं ?*

साथ असं म्हणाता नये. त्यांच्याबरोबरीन मी चालते. मराठी, कन्नड, इंग्रजी साहित्याची आवड त्यांना आहे. त्यांच्यामुळे मला एक दिशा मिळाली. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. घरात एकवेळ जेवण नाही झालं तरी वाचन झालं पाहिजे याच्यावर त्यांचा अधिक भर असतो. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या‌. एकांकिका लिहिताना त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला. वाचन होताना प्रथम ते मनावर बिंबवलं जात. त्यानंतर साहित्य लिहिलं जात. मुक्तछंदात लिहिलेल्या कवितांचे शब्द सर्वांपर्यंत पोहोचतात. बहिणाबाई कुठल्या शाळेत शिकलेल्या ? पण, त्यांच्यावर साहित्यसंस्कार होते.  


*सद्या कोणत्या प्रकारचे लेखन करत आहात ?*

सध्या केवळ लहान मुलांच्या कथा लिहीत आहे‌. मला त्या मुलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आरती अंकात काही छापून आल्या आहेत. चांगल्या प्रकाशकाच्या मी शोधात आहे. तर दुसर म्हणजे वाचन होतय की नाही ? हा प्रश्न आहे. नुसतं पुस्तक येऊन उपयोग नाही. त्याच वाचन झालं पाहिजे. मुलांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. माझ कविता लेखनही सुरु आहे. पण, नुसतं छापून आणण्यापेक्षा आहे ते ठीक. मला आवड आहे मी लिहीत आहे. श्रवण देखील करत आहे. फातर्पेकर सरांचं यक्षगान नंतर 'दशावतार' पुस्तक येत आहे. 


*कै.डॉ. हरी उर्फ भाऊ परूळेकरांची स्मरणिका काढतानाचा अनुभव कसा होता ?*

गेली ७८ वर्ष सावंतवाडीत आहे. तीन पिढ्या माझ्या ओळखीच्या आहेत. सगळ्या समाजात चांगले ऋणानुबंध आहेत. आजही ते टीकून आहेत. कारण,भाऊंची मी मुलगी आहे व सर जावई आहेत. सावंतवाडीनं आम्हाला भरपूर प्रेम दिल आहे‌. माझे वडील डॉक्टर होते. त्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकांना व्हावा, समाजासाठी काहीतरी करावं या हेतूनं कार्य केलं. आमच्यासह जवळपासच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अनेक मुलांना त्यांनी शिकवलं. आजही त्यांच्यासोबत आमचे चांगले संबंध आहेत.‌ वडीलांकडून मिळालेल्या पुण्यायीतून उतरायी होण्यासाठी स्मरणिकेचं संपादन केलं. 

नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काय वाटत ?

हे वाचल्यानंतर मलाच एक प्रश्न पडतो की यामध्ये शिक्षक म्हणून मी बसू शकले असते का ? याच उत्तर नाही अस येत. हे शिक्षण चौकटीत बसवलेलं आहे. शिक्षण चौकटीत बसवलेल असता नये, ते मोकळं असाव. अभ्यासक्रम वर्षात पूर्ण झालं पाहिजे हे तेवढंच खरं आहे. पण, ज्या दिवशी मुलांचा वर्गात लक्ष नसतो त्यावेळी शिक्षकान शिकवून पाटी टाकून येण हे माझ्यावरचे संस्कार नाहीत. आजच्या मराठी पुस्तकात एका कवितेला चाल नाही. मुलं कविता म्हणार कशी ? हिंदी सिनेमाची गाणी मुलांची पाठ असतील तर कविता पण असायलाच हव्यात. मुलं कमी हुशार असं नाहीय. आपण त्यांना काय देतोय हे महत्त्वाचे आहे. त्याचा विचार केला पाहिजे. इंग्रजी माध्यमात गेलेली मुलं पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, वृद्धाश्रम वाढवावेच लागणार. 

नव साहित्यिकांना काय सांगाल ?

आजच्या पिढीतील मुलांना काहीतरी हवं आहे. त्याच खरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी वाचन करावं. वाचन केल्यानंतर ते व्यक्त होत आहेत. ते जे सांगू इच्छित आहेत ते वाचनाचं फलित आहे. त्यासाठी मोबाईल वापरला तर चालेल. चांगल्या सिनेमा, कथांचे परिणाम देखील मुलांवर होत असतात. साहित्यात पुस्तकाप्रमाणे चित्रकला, लेखन, संगीत, पर्यावरण हे देखील येत. नव्या पिढीपर्यंत ते पोहचत आहे याचा आनंद आहे.‌ ते प्रमाण दहा टक्के का असेना, मुलं वाचत आहेत‌.

मला त्यांच कौतुक आहे. त्यांनी वाचाव, लिहावं, व्यक्त व्हावं हाच संदेश त्यांच्यासाठी आहे.


शब्दांकन : विनायक गांवस 

छाया : प्रसाद कदम