विजघर घाटीवडे वळणावर कारची समोरासमोर धडक

Edited by: लवू परब
Published on: August 17, 2025 21:13 PM
views 87  views

दोडामार्ग : विजघर घाटीवडे येथील एका धोकादायक वळणावर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारच्या समारास घडली. यात तिघे जण किरकोळ जखमी झाले. तसेच दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. घाट माथ्यावरील काही पर्यटक गोव्याला जाण्यासाठी रविवारी दुपारच्या सुमारास तिलारी घाट मार्गे दोडामार्गच्या दिशेने येत होते. तर एक कार दोडामार्गहून वीजघरच्या दिशेने जात होती. विजघर घाटीवडे येथील वळणावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन्ही कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती स्थानिकांना समजतात ते घटनास्थळी धावून आले. जखमींना तत्काळ मदत पुरवण्यात आली  विजघर घाटीवडे परिसरातील वळण अत्यंत धोकादायक असून, पावसाळ्यात गटारे पूर्णतः बुजल्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही. या भागात मागील काही काळात वारंवार अपघात घडले असून, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रेडीयमयुक्त रबर गतीरोधक बसवण्याची अनेकदा मागणी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.