
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सावर्डेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावर सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार मा. शेखरजी निकम होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत संचालक, कर्मचारी, सभासद तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन विजय काटे यांनी प्रास्ताविक केले. १९६४ मध्ये स्व. गोविंदरावजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अल्प ठेवीवर सुरू झालेली ही पतसंस्था आज प्रचंड झेप घेत असून दरवर्षी ‘अ’ श्रेणी मिळवते आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार शेखरजी निकम म्हणाले की, “सभासदांच्या उन्नतीसाठी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. मात्र वर्गणी व शेअर्सच्या माध्यमातून पतसंस्थेने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली पाहिजे. संस्थेच्या शाखांनी मिळविलेली बक्षिसे अभिमानास्पद असली तरी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत.”
या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला उपाध्यक्षा पूजाताई निकम, पतसंस्थेचे सचिव नामदेव गावडे, संचालक मंडळाचे सदस्य मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, सेक्रेटरी महेशजी महाडिक तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत २०२४-२५ या वर्षाच्या अहवालास, आर्थिक पत्रकांना, नफा वाटपाला तसेच हिशोब तपासणीसांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. भागभांडवल, व्याजदर आणि आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चाही झाली. यावेळी संचालक मंडळाच्या शिफारशीला मान्यता देत सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सभेचा विशेष सोहळा मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार हा ठरला. आमदार शेखरजी निकम यांची विधानसभेत सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सह्याद्री परिवारामार्फत त्यांचा गौरव करण्यात आला. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांनी गांधी तिर्थ फाऊंडेशनमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री “माझी शाळा – सुंदर शाळा” योजनेत टाळसुरे, फुरुस, आंबडस, असुर्डे, तुळशी व वेळणेश्वर येथील शाळांनी जिल्हा व तालुका स्तरावर मिळविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळांचा गौरव करण्यात आला. तसेच एनबीए मानांकन प्राप्त कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे व नॅक मानांकन प्राप्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय विविध शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी व प्राध्यापक यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. अनिरुद्ध शेखर निकम (एम.एस्सी., युनिव्हर्सिटी ऑफ क्युझलॅन्ड, ऑस्ट्रेलिया), प्रा. भागडे हरिश्चंद्र सोमा (पीएच.डी., शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली), प्रा. पाटील अश्विनी भाऊसाहेब (पीएच.डी., गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी), प्रा. गावडे अनुराधा एकनाथ (पीएच.डी., गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. नेमाडे ललिता शशिकांत (हरबल नेल पेंटसाठी राजीव गांधी पुरस्कार), प्रा. सुरेंद्र सुधाकर हातखंबकर (राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा) आणि कु. मंथन जयंत लाड (योगा इंडो-नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक) यांचा समावेश होता.
सभेत सेवानिवृत्त कर्मचारी, २०२५ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्तीधारक मुलांचा तसेच संस्थेच्या ज्या शाळा व महाविद्यालयांचा निकाल १००% व ९०% पेक्षा जास्त लागला आहे, त्या प्राचार्य व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन दादासाहेब पांढरे व शिवलिंग सुपनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हातणकर यांनी केले. अशा प्रकारे पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या पार पडली.