रोहा : आपल्या सुमधुर आवाजाची सबंध महाराष्ट्राला भुरळ घालणारे दमदार गायकीचे उगवते तारे परमेश माळी, योगेश आग्रावकर आणि सोनाली भोईर यांच्या गीतांचा स्वराविष्कार कार्यक्रमाचा धाटावकरांनी परिपूर्ण आस्वाद घेतला. आपल्या गीत गायनाने असंख्य चाहत्यांच्या सहृदयी ठासून भरलेल्या या तिन्ही गायकांनी नवरात्रीनिमित्त तब्बल चार तास आयोजित कार्यक्रमात अनेकजण जल्लोषात थिरकले.
परमेश माळी यांनी सुरुवातीलाच 'दि. बा. साहेबांच्याच नावाचं होणार विमानतळ', 'एकच वादा आमचा राजू दादा', 'सपनान आयली माय माझी सपनान आयली माय', 'आणु शिर्डीचे लाडू', 'गाडी चाचली सोळा डब्यांची गो सोळा डब्यांची' या गाण्यांनी रंगत आणल्याने तरुणाई चांगलीच थिरकली. योगेश आग्रावकर यांच्या 'आई तुझं देऊळ सजतय गुल्लाले डोंगरान', 'तुझेच भेटीसाठी गो आई जीव माझा तळमळतय', 'बसली मानान करण्या भक्ताच रक्षण' या गाण्यावर अनेकांनी ठेका ठरला. मात्र सोनाली भोईर यांच्या 'पंढरी शेठ फडके बिगरवाला बिन दोड छकडेवाला', 'नवरात्रीचे सणाला जमलान लोकं गरबा खेळाला', झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावं बैसून झुलली', 'चला दर्शनाला म्हणू नका नका' अशा विविध गाण्यांचा नजराना सादर केल्याने अनेकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही.
या कार्यक्रमात ढोलकी वादक प्रतीक नाईक, ड्रमसेट वादक प्रीतम पाटील, जगदीश पाटील, दर्शन ढोरे
कायबोर्ड वादक लाभेश पाटील, कोरस लाभेश पाटील, जयेंद्र पाटील, भूमी काळबेरे यांनी उत्तमरित्या साथ दिली.
लावणी नृत्यांगना करुणाने तर असंख्य रसिकांची मने जिंकली. यात अँकर डी. महेश यांनी उपस्थितांची मात्र चांगलीच करमणूक केली. या कार्यक्रमात धाटाव गावाची शान सोनारसिद्ध महाराज गाणे सर्वांना आकर्षण ठरले.
दररोज टी. व्ही. आणि मोबाईलवर दिसणारी ही गायक मंडळी प्रत्यक्षात समोर गात असताना पाहायला मिळाल्याने महिला वर्गाने समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला सरपंच अशोक मोरे, उपसरपंच यशवंत रटाटे, राष्ट्रवादी रोहा युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, उद्योजक सचिन लिंबोरे यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सादरकर्ते आणि उपस्थित मान्यवरांचा याप्रसंगी गाव कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.