
कणकवली : कवी अजय कांडर यांना राजापूर लांजा नागरिक संघामुंबईतर्फे देण्यात येणारा 2026 चा अक्षरमित्र पुरस्कार लांजा रिंगणे ज्येष्ठ संपादक माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलना प्रदान करण्यात आला. विख्यात व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर आणि नामवंत चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराने कांडर यांना गौरविण्यात आले.यावेळी साहित्य कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
लांजा- रिंगणे येथे पद्मश्री केतकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवशीय राजापूर लांजा नागरिक संघाचे अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी कवी कांडर यांना त्यांची गेल्या 35 वर्षातील साहित्य चळवळीची वाटचाल लक्षात घेऊन अक्षरमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी अजय कांडर हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी असून त्यांनी विविध संस्थांची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम राबवून अनेकांना प्रसिद्धी दिली. गुणवत्ता असणाऱ्या लेखक, कवींचा शोध घेऊन विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई येथे त्यांनी विविध संस्था सुरू करून अनेक लेखक, कवींना उजेडात आणले. या सगळ्याची दखल घेऊन हा पुरस्कार कांडर यांना प्रदान करण्यात येत असल्याचे या पुरस्कार वितरण प्रसंगी आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
अजय कांडर हे कोकणतील जबाबदार साहित्य - सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी तळकोकणात गांभीर्याने साहित्य चळवळ चालू ठेवली आहे. साहित्य लेखन आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे मराठीतील मान्यवर लेखक कवींची पुस्तके प्रसिद्ध होत असतात. ग्रामीण भागात नव्याने ग्रंथालय चळवळ सुरू करणाऱ्या संस्थांसाठी आपल्या प्रकाशनाची पुस्तके ते मोफत देत असतात. आवानओल प्रतिष्ठान कणकवली, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजी या साहित्य संस्थांची त्यांनी स्थापना केली असून या माध्यमातून कोकणसह महाराष्ट्राच्या विविध भागात अतिशय गांभीर्याने विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षीपासून अजय कांडर यांच्या संकल्पनेतून मुंबई येथे पंडित सत्यदेव दुबे नाट्य, चित्रपट पुरस्कार, कादंबरीकार भाऊ उपाध्ये साहित्य पुरस्कार आणि प्रा.गोपाळराव दुखंडे पुरस्कार सुरू करून कला साहित्य चळवळ क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्याचे काम करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून 'सारेच पुरुष नसतात बदनाम' सृजनरंग, सिंधुदुर्गातील आजची कविता, सिंधुदुर्गातील नवी कविता हे महत्त्वाचे ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत.










