The fox या तुमच्या आधीच्या प्रकाशित झालेल्या, जागतिक यशप्राप्त नाटकानंतर आता तुमचे Its Already Tomorrow हे नाटक पुस्तक रुपाने प्रकाशित झाले आहे. त्याबद्दल काय सांगाल ?
-- हो नाटक प्रकाशित झाले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी समाधानी आहे. The fox नंतर अगदी दोनच वर्षांत Its Already Tomorrow प्रकाशित झाले आहे. अनेकदा आपण नियोजन केल्याप्रमाणे काही गोस्टी वेळेत घडत नसतात. परंतु एका कलाकृती नंतर दुसरी कलाकृती सुचणे ती लिहिली जाणे आणि त्यानंतरची संपादनाची आणि प्रत्यक्ष प्रिंटिंगची प्रक्रीया या दरम्यान अनिश्चित काळ जाऊ शकतो. मात्र तुलनेने २ वर्षे हा काळ त्यासाठी कमीच आहे असे मी मानतो. दोन वर्षांतच दुसरे नाटक प्रकाशित झाले आहे याचा आनंद आहे.
हे नाटक सुचणे आणि प्रत्यक्ष प्रकाशित होणे या प्रक्रिये दरम्यानचा तुमचा अनुभव कसा होता ?
-- अत्यंत योग्य प्रश्न विचारलात सर. The fox नाटकाला अगदी जागतिक स्तरावरुन तसेच सर्व स्तरातून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. अद्यापही मिळत आहे. तथापि The fox ची trilogy अर्थात, त्रिनाट्यधारा लिहावी असा मी विचार करत होतो. यातील दुसरे नाटक कोणते असावे असा मी विचार करतच होतो. दरम्यान नाटक मनात आकार घेत होते काही संवाद संदर्भ सुचतील तसे नोट करत होतो, कालांतराने Its Already.. चा पहिला अंक लिहुनही होत होता त्याचे एडीटिंग सुरु झाले होते आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर अचानक दु:खद सावट आले. माझ्या वडिलांचे अत्यंत धक्कादायक असे अचानक निधन झाले. हा अचानक झालेला अघात होता.माझ्यासाठी यातुन सावरणं आणि स्वताला समजावणं खुप मुश्किल झालं होतं कारण वडिलांचे आणि माझे नाते काही प्रमाणात आतुन वडिल मुलाच्या प्रेमाचे परंतु बाहेरून ते तणावाचे राहिले कायम परंतु त्यांना माझ्या लेखनाबद्दल कधी तक्रार नव्हती कधी कधी तर तणाव निवळून आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. परंतु त्यांचे जाणे एकदम कोसळून टाकणारे ठरले.ही अलिकडील घटना आहे. त्यानंतर माझी संपुर्ण मानसिकता बदलून गेली. जिवनातील अनिश्चितता मी स्वता अनुभवत होतो. दु:खातुन पळवाट म्हणुन नव्हे परंतु सावरण्यासाठी मी या नाटकाचा दुसरा अंक लिहायला घेतला आणि अत्यंत अस्वस्थ आणि वर्णनातीत आणि विचित्र मनो अवस्थेत मी हे नाटक लिहुन पूर्ण केले...
Horizon Books प्रकाशनाचे तरूण प्रकाशक विक्रम केवाडिया यांनी ते आता प्रकाशित केले आहे.
The Fox नंतर आताच्या Its
Already या नाटकामध्ये तुम्ही वाचक प्रेक्षक यांना कोणता संदेश दिला आहे ? तसेच या दोन्हीही नाटकामध्ये कोणता परस्पर विचार संबंध आहे ?
--- Its Already हे ॲब्सर्ड शैलीतील नाटक आहे तसेच त्यामध्ये संवाद ,अर्थ आणि तार्किकतेत असंबद्धता दाखविणारी gibberish संवाद पध्दती मी योजली आहे.
संपूर्ण वैश्विक मानवी समुदाय
सांस्कृतिक दहशत आणि सांस्कृतिक मर्यादा आणि सांस्कृतिक अराजकात सापडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अटळ असणारी संस्कृती धर्म न्यान हेच मनुष्याचे शत्रू झाले आहेत अशा काळात काही सत्तापिपासु शक्ती त्या आडुन संपूर्ण समाजाचे जनावरीकरण अराजकीकरण करु पाहत आहेत आणि त्याचा विश्व समाजाला मोठाधोका आहे. यामधे सर्वप्रथम बळी जाणार आहे तो अती सामान्य मानवी समुदायांचा या संभाव्य भीषण अराजकाबद्दलच Its Already Tomorrow भाष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
The fox मध्ये अशा अराजकाचे सावट दाटपणे प्रतिबिंबीत झाले आहे मात्र The fox मध्ये सत्तांध शक्ती कशा नरभक्षक क्रूरकर्मा होवु शकतात ते मांडण्यात आले
आहे मात्र या नाटकामध्ये सांस्कृतिक भय कसे अराजकाचे मुळ ठरु शकते संपूर्ण समाजच असंबद्ध होवु शकेल का ? की त्याच अमानुषकरण होइल ?
याचंच ॲब्सर्ड शैलीत प्रत्यंतर इथे प्रकट होतं आणि तेही वेगळ्या प्रायोगिक भाषिक पध्दतीने आणि नव्या नाट्यरुप बंधातुन.
तुमचा आजवरचा साहित्यिक, कला प्रवास खुप संघर्षमय आहे त्याबद्दल सांगा.
-- सर आजवर माझ्यासाठी एकही गोस्ट कधी सोपी नव्हती तशी ती कुणासाठीच सोपी नसते.
सरमळे सारख्या दुर्गम व एकेकाळच्या खुप मागास अशा गावातुन मी आलो आहे.
(आता माझा गाव बराच प्रगत झाला आहे )
इंग्रजी विषयातुन मी उच्च पदवी घेतली याच काळात मी लेखनाकडे खुप गांभीर्याने पाहत होतो व व्यापक वाचनही सुरु झाले होते. परंतु उपजीविकेसाठी मी मुंबई गाठली. फार काही मोठी नोकरी मिळाली नाही परंतु याच काळात माझे लक्ष रंगभूमीकडे वळले इतके की त्याचे व्यसन लागले. मुंबईत कधी नीट बस्तान बसले नाही तरीही नाटक साहित्य या ध्यासापायी माझे मुंबईत जाणे काही काळ राहणे आणि पुन्हा निघून येणे सतत सुरु राहीले असे दहा बारा वर्षे सुरु होते जसे की माझी रंगभूमी आणि साहित्य याबद्दलची ' शाळाच ' सुरु होती.
परंतु कालांतराने मग साहित्य नाटक क्षेत्रातील गटा तटाचा खुप वाईट अनुभव आला. त्यामुळे मी या सर्व गट तट कळप यापासून स्वताला कायमचे दुर केले व आपण फक्त शक्य असेल ते जगभरातील वाचावे व जाणवेल ते लिहावे असे
ठरवले ते आतापर्यंत तसेच सुरु आहे माझे.
तळकोकणात साहित्य, रंगभूमी, सामाजिक चळवळ इत्यादि मध्ये कार्यरत असताना गेली वीस वर्षे मला असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागले उपेक्षा अवहेलना बदनामी गटातटाचे राजकारण तसेच जाणीवपूर्वक लक्ष करणे इत्यादी गोस्टी माझ्याबाबत सतत घडवल्या जात होत्या.
तरीही मी माझ्या साहित्य कला साधनेपासुन कधीही विचलित झालो नाही. ज्या शोषित समाजातून मी आलो त्या समाजाच्या उत्थानासाठीचे विचार मी सातत्याने मांडले प्रसंगी प्रस्थापित समाजाचा रोष ओढवून घेतला एवढेच नव्हे तर माझ्यावर शारिरीक हल्लेही झाले परंतु मी त्याचे कधी भांडवल केले नाही किवा जातीचा कधी साधा फायदा घेतला नाही आजवर स्वतासाठी, परंतु येथील त्याच शोषित समाजातील कित्येक लोकांनी ज्यांना माझा अडसर वाटत होता व आहे त्यांनी माझी बदनामी करुन मलाच संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मी ठरवले की मी कोणत्याही एका विशिष्ठ समाजाचा लेखक नसुन मी एकुण मानव जाती संदर्भात विचार आणि लेखन करणारा फक्त लेखक आहे आणि मी आजही माझे काम करीत आहे.
परंतु आजवरच्या संघर्षात तुम्हाला मदत करणारे हातही असतील ?
-- अगदीच ! अनेक सहकार्याचे हात आहेत, प्रतिकूल काळ आणि परिस्थितीत अपवादात्मक का असेना समजदार आणि आणि चांगले माणसे भेटलीत आणि त्यांचे खुप सहकार्य झाले त्या सर्वांचा मी मनपुर्वक ऋणी आहे.
कोकणचे सुपुत्र व ज्येष्ठ कवी कादंबरीकार आदरणीय विद्याधर भागवत सर यांनी माझ्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात मला नेहमीच आपलेपणाची वागणुक दिली पडत्या काळात आर्थिक मदत व मॉरल सपोर्ट केला मी सातत्याने काही लिहावे असे ते सांगत व मी लिहिलेले आवर्जुन वाचत व आपले मत व्यक्त करताना सांगत असत की तु वेगळं आणि ताकदीचे लेखन करत आहेस.. असे सांगुन ते मला नेहमी प्रोत्साहन देत असत.
याही पुढे जाऊन भागवत सर एकदा म्हणाले होते की ' तुझे लेखन आणि त्याची खोली आणि त्यातील गूढपणा पाहिला की मला तुझ्यात 'आरती प्रभु ' दिसतात.. तुच आरती प्रभु आहेस.. तुझ्या रूपाने दुसरे आरती प्रभु जन्माला आले आहेत कोकणात ..."
अर्थात यामध्ये त्यांचे माझ्याविषयीचे निस्सीम प्रेम दिसून येते, अन्यथा आरती प्रभू हे तर आम्हा कोकणकरांचं ' नक्षत्रांचे देणं 'आहे, त्यांच्यापुढे मी असलोच तर एक सामान्य ज्योत आहे.
The fox त्रिनाट्यधारेतील तिसरे नाटक कधी लिहुन होइल ? ते कोणते असेल ? त्यात काळाचे कोणते वेगळे भाष्य असेल ?
आजच्या सामाजिक साहित्य कला इत्यादी विषयी तुमचे विचार काय आहेत ?
-- The fox त्रिनाट्यधारेतील तिसरे नाटक कोणते असेल किवा त्याचे स्वरूप काय असेल इत्यादीबद्दल पूर्णता अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाहीये. मात्र माझ्या डोक्यात त्या दिशेने विचार सुरु झाले आहेत. येत्या काळात त्या संदर्भात आवश्यकता वाटल्यास थोडे संशोधन करावे लागेल. हे तिसरे नाटक पहिल्या किवा दुसऱ्या नाटकाचे एक्स्टेंशन असणार नाही तर ते एक स्वतंत्र नाटक असेल.
मी यापूर्वीच या नियोजित नाटकाचे नाव Vulture Whispers असेल असे स्पष्ट केले आहे मात्र ते अंतिम असेल का हे मी आताच सांगु शकणार नाही.
या लेखनात ही पशु आणि कृर पक्षांची प्रतिके मानवी पशुतेचे प्रतिक बनुन येतात की ते मानवीयतेच आदीमुळ आहे ? याचाही मला लेखक म्हणुन शोध घ्यावासा वाटत आहे तो शोध या तीन्ही नाटकात व्यापून राहीला आहे असे मला वाटत आहे.
कोणत्याही लेखकाचा स्वताचा काळ व अवकाश असतो लेखकाच्या काळाबरोबर समाज कधीही चालु शकत नसतो आणि नाही.
आणि काळाचे अवलोकन करणे विवेचन करणे भाष्य करणे किवा काळाचे मर्म सांगणे ही सर्वात कठीण बाब आहे या विश्वातील,
परंतु प्रत्येक लेखक आपल्या क्षमतेनुसार ते अवलोकन करण्याचा प्रयत्न करत असतो.
या trilogy मधून किवा माझ्या इतर लेखनातून मी तेच करत आलो आहे.
कला साहित्य आणि तत्वज्ञान एका अत्यंत कळीच्या वळणावर पोहचले आहे. जगभर दमन शक्ती वाढत आहेत. जाहीर हिंसा आणि अत्याचार होत आहे. युद्धे खरी खोटी आणि शितयुद्धे सुरु आहेत.
कित्तेक नोबेल लॉरियेट आज हयात आहेत परंतु युक्रेनमध्ये अगदी निरागस मुले मरत आहेत.
हे लोक एका शब्दाने त्याबद्दल बोलत नाहीत किवा त्यांच्या एका शब्दाचा काही परिणाम जागतिक हुकुमशहांवर होत नाहीये. संपूर्ण जगात कला साहित्य खुप प्रायोगिक झाले तरी ते या काळापुरते तरी बोथट झाले आहे परिणामशून्य झाले आहे दमन शक्तीसमोर, आणि कोणतीही भूमिका नसलेले साहित्य कला साहित्यिक आणि कलाकार हे आजच्या भांडवलशाहीचे अपत्य आहेत,
त्या अर्थाने, या काळासाठी असे साहित्य आणि कला मेलेले आहेत. अर्थात साहित्य आणि कलेचा अंत झाला आहे.