कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष सदर आम्ही घेतोय. याच्या अठराव्या पुष्पात ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉ. सुनील सावंत यांची दै. कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
१. साहित्याकडे तुम्ही कसे वळला ? साहित्याचे संस्कार कसे झाले ?
साहित्याची सुरूवात लहानपणापासून झाली. पन्नास वर्षांपूर्वी दैनिक वाचनातून, आई- वडिलांकडून साहित्य संस्कार मिळाले. वरळीतील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलं. त्या शाळेच नाव 'तबेला' असं होतं. त्या शाळेतील शिक्षकांनी लिहिण्याचे संस्कार केले. निबंध स्पर्धांच्या माध्यमातून लिहू लागलो. त्यानंतर 'शारदाश्रम' विद्यालयात प्रवेश घेतला. शाळेच्या अंकात माझी कविता प्रकाशित झाली. ती कविता एका घटनेतून लिहीलेली होती. ज्या ठिकाणी मी राहत होतो तेथे एक चिमणी मृतावस्थेत पडलेली होती अन् कावळे तीला चोच मारत होते. ते बघून, ती वेदना बघून मनात गलबलून आलं. त्या चिमणीवर कविता तयार झाली. सातवीत असताना मी लिहिलेली ती पहिली कविता होती. वर्गशिक्षकांना ती कविता आवडली. शाळेच्या अंकात ती प्रसिद्ध झाली. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत सुरु आहे. कॉलेज जीवनात मराठी वाड्.मय मंडळात काम करण्याची संधी मिळाली. ते करत असताना अनेक साहित्यिकांच्या भेटी झाल्या. दिग्गज साहित्यिक शन्ना नवरे, मधुसूदन कालेलकर, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे अशी मंडळी आम्हाला भेटली. त्यामुळे मनात साहित्याच बीज रूजलं गेलं. ठरवून कधीच लिहीलं नाही. आधी ते मनात रूजायच नंतर कागदावर उतरायच. अशाप्रकारे माझा साहित्य प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत २१ पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे.
२. तुमची २१ पुस्तक प्रकाशित झालीत. काय सांगाल या प्रवासाबद्दल?
याची सुरुवात कॉलेज जीवनापासूनच झाली. या काळात अधिक कविता लिहिल्या गेल्या. कमी शब्दांत भावार्थ अधिक मांडता येतो म्हणून कविता हे माध्यम मी निवडलं. दैनिकातून व्यासपीठ मिळत गेली. माझ्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. त्यामुळे अधिक उत्साह निर्माण झाला. १९८४ मध्ये माझा व कवी वसंत माने यांचा संयुक्त काव्यसंग्रह प्रकाशित करण्याच आम्ही ठरवलं. तो काव्यसंग्रह सामाजिक प्रश्नांवर होता. पन्नास पानांचा हा काव्यसंग्रह होता. त्यानंतर कवितासंग्रह प्रकाशित होत गेले. नोकरी सांभाळून मी माझा छंद देखील जोपासला. नंतर कथासंग्रह देखील प्रकाशित झाला. दिग्गज साहित्यिकांचा सहवास मिळाल्याने चांगली लिहिता आलं. आमच्या मार्गदर्शकांचा एकच संदेश असायचा की, ''सतत लिहीत रहा, नंतर पुन्हा वाचा, बदल करावे वाटल्यास बदल करा व दर्जेदार कृती निर्माण करा.''
३. कोणत्या प्रकारची कविता अधिक आवडते ?
माझ्या कविता मुक्तछंदात अधिक लिहिल्या आहेत. त्याला एक लय असते. सामाजिक विषयांवर माझ्या अधिक कविता आहेत. ज्वालामुखी या काव्यसंग्रहांत गिरीणा संप, कामगारांवर संदर्भात लिखाण केलं होतं. लोकशाही संदर्भात एक कविता होती. महाराष्ट्र शासनाच्या संदर्भग्रंथात त्याचा समावेश केला गेला आहे.
४. कवि केशवसुतांपासून आजपर्यंतच्या कवितांवर आधारित 'कवितांचा प्रवास' अंतर्मनात दडलेली कविता या आपल्या उपक्रमाबद्दल काय सांगू इच्छिता ?
केशवसुतांपासून आजच्या कवींचा हा प्रवास या 'कवितांचा प्रवास' अंतर्मनात दडलेली कविता उपक्रमातून उलगडा जातो. आधुनिक कवितेचे जनक केशवसुत त्यांची 'तुतारी' कविता सामाजिक भान असणारी, नंतर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांसारखे अनेक नामवंत कवींनी सामाजिक भान असणाऱ्या कविता लिहील्या. अंतर्मनात दडलेली कविता म्हणजे सांगायचं झालं तर या कवींनी जे लिहिलं ते प्रत्येकाच्या मनातल होत. जे त्यांनी लिहिलं ते सर्वसामान्यांच्या मनातलं होत. पण, सगळे लिहीत नाहीत. लिहीणारे थोडे असतात. अंतर्मनात दडलेली कविता ही प्रत्येकाच्या मनातील भाव आहेत. ते भाव या उपक्रमातून मी मांडतो. प्रत्येक कवीची एक कविता सादर करतो.
५ . सूर्य दिसत राहील तो पर्यंत...., माझी वस्ती मी शोधतोय, स्वातंत्र्याची हाक या काव्यसंग्रहांची नाव थोडी वेगळी आहेत. या काव्यसंग्रहां मागची संकल्पना काय होती.
सूर्य दिसत राहील तो पर्यंतची संकल्पना अशी की मानवजातीच्या अस्तित्वात पर्यंत प्रत्येकाला जगायचच आहे. या दरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितींशी संघर्ष देखील करायचा आहे. म्हणून, या काव्यसंग्रहांच नाव असं ठेवलं. माणसानं आपलं जीवन जगताना हे विश्व कायम राहणार आहे हे लक्षात ठेवून त्यात रंग म्हणून आनंद मिसळावा हा मुख्य हेतू होता. स्वातंत्र्याची हाक काव्यसंग्रहात देशातील जाती भेदाच्या गोष्टीवर लेखन केलं आहे. जातीभेदाच्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. अर्थात ही गोष्ट कठीण आहे. पण, आजच्या काळात धर्म माणूस अन् जात स्त्री अथवा पुरुष मानून जगणं आवश्यक आहे. कारण, शालेय जीवनातच जातीभेद, धर्मभेद आपण निर्माण करतो. हे नष्ट करायचे असेल तर माणुसकीचा धर्म शालेय जीवनात वाढायला हवा. सरकार पातळीवर जाती भेट वाढवून ठेवले आहेत. सरकारन यावर विचार न केल्यास 'जात जाणार नाही' आहे.
६. तुम्ही आजवर अनेक कविता लिहिल्या आहेत. अन्य लेखन, भाषांतरही केले आहे. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
कथा लिहिताना खुप चांगला अनुभव आला. कथांचं बीज मनात रुजलेल असायचं. कथा लिहिताना एका ओघात ती लिहून पुर्ण व्हायची. व.पु.काळे याबाबत म्हणायचे, तुम्ही जेवढं व्यक्तिगत लिहालं तेवढ ते वैश्विक होईल. प्रत्येकांच्या जीवनात घडणारी गोष्ट कथेत असते. हिंदी व इंग्रजी पुस्तकांच भाषांतरही केलं आहे.
७.आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल काय भावना आहेत?
अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस' वॉशिंग्टन या अमेरिकेतील लायब्ररीत दरवर्षी विविध पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केली जाते. २००७ सालाकरिता 'डॉ. सुनील सावंत कवी आणि कविता' समीक्षा ग्रंथाची निवड झाली. हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला तेव्हा आनंद झाला. हा मराठी भाषेचा सन्मान होता. मी फक्त माध्यम होतो. मराठी भाषेचा सन्मान आंतरराष्ट्रीय पातळीवर केला गेला याचा प्रचंड आनंद झाला. यासह अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली.
८. कवितेचे अभ्यासक म्हणून आजच्या मराठी कवितेविषयीची नवकवींविषयी काय सांगाल ?
नवं कवी, लेखकांनी लिहीत रहावं. लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचाव, त्यातून चांगली कलाकृती निर्माण करावी. आपण लिहिलेल याआधी कुणी लिहिलं आहे का ते पहावे. आपल्या साहित्याची निर्मिती करावी. यासाठी वाचन अधिक महत्त्वाच आहे. मराठी साहित्याच वाचन करण आवश्यक आहे. काही कविता लिहून पुस्तक प्रकाशित करण्याचा अट्टाहास नसावा. दर्जेदार कविता निश्चितच प्रकाशित होतील त्यासाठी वाट पहावी. प्रकाशित झालेली कविता सादर करावी, कवी संमेलन, साहित्यिक संमेलनात सहभाग घ्यावा. हळूहळू प्रस्थापित व्हाव. कविता दर्जेदार असेल तर सर्वच त्याचा स्वीकार करणार. हल्ली बघितलं तर विशेष काही नसलं तरी मिरवणारी मंडळी दिसतात. असं करू नये, मिरवण्याने प्रस्थापित होता येत नाही. चांगलं लिखाण करा रसिक वाचक आपोआप तुमच्याकडे येतील.