पेडणे : कातकरी समाज तसा अजूनही दुर्लक्षितच. ना हक्काची घरं...ना मुलभूत सुविधा...शिक्षणाचे वारे तर इथं फार क्वचित फिरतात. मात्र हे चित्र बदलण्याचा ध्यास घेत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत पेडणेच्या गणेश पवारने शिक्षणाचा 'श्रीगणेशा' केलाय. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा इथल्या समाजातील पहिला विद्यार्थी ठरलाय. त्याने मिळवलेल्या या यशाचं कौतुक होतेय. गणेशच्या रूपाने आता शिक्षणाचं बीज इथल्या समाजात रोवलं जाणार आहे.
पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथील कातकरी समाजात गणेश पवार राहतो. 10 वीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात गणेशने 44 टक्के गुण घेतलेत. पेडणेतीलच वळपे - विर्नोडा येथील विकास हायस्कूलमध्ये तो शिकत होता. घरापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे. शाळेतल्या शिक्षकांचं, समाजातील विविध लोकांचं मार्गदर्शन आणि त्याची जिद्द यामुळेच गणेशने हे यश प्राप्त केलंय. 10 वी पर्यंतचं शिक्षण घेऊन पास होणारा समाजातील पहिला मुलगा गणेश ठरलाय. मोलमजुरीवरच उदारनिर्वाह करणारा हा समाज. पिढ्यानपिढ्या या समाजाच्या नशिबी संघर्ष पाचवीला पुजलेला. गणेशच्या घरचीही हीच स्थिती. तरीही मोठ्या चिकाटीने त्याने आपलं 10 वीचं शिक्षण पूर्ण केलं हे विशेष.
गणेशच्या मेहनतीसोबतच अनेकांचं त्याला लाभलेलं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. सिंधुदुर्गातील मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी समाजात शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. डॉ. पाटकर यांनी येथील मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करून दिशा देण्याचं काम केलं. याचबरोबर अमोल कदम आणि श्री. नारायण हे येथील कातकरी समाजाच्या वस्तीवर मुलांची शिकवणी घेतात. त्यांना अक्षर ओळख करून देतात. गणेशच्या शाळेतील शिक्षक रत्नाकर राऊत, गोवा स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सचे पीटर बोर्जीस यांनीही फार मोठी मदत केल्याचं, त्याचे वडील हनुमान पवार यांनी सांगितलं.
मूलभूत सुविधांपासून वंचित !
कातकरी समाज अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्या वस्तीत लाईट आली. ओळख सांगणारी सरकारी कागदपत्र त्यांना मागच्या 2 वर्षात मिळाली. रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्मदाखले अशी कागदपत्र मिळण्यासाठी 2022 साल उजाडण्याची वाट पहावी लागेल. सरकारच्या योजनांची मदत मागच्या काही वर्षापासून होतेय. कारण त्या योजना या समाजापर्यंत पोचतच नव्हत्या. ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. समाजाच्या इतरही मुलांनी गणेशप्रमाणे शिकावं, अशी इच्छा त्याच्या वडिलांनी बोलून दाखवली. रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी पदरी योग्य शिक्षण हवं, याची जाणीव त्यांना झालीय. शिवाय शौचालया अभावी इथल्या महिलावर्गाला होत असलेला त्रास याकडेही त्यांनी यानिमित्ताने लक्ष वेधलं.
गणेशला बनायचंय पोलीस !
एवढ्यावरच न थांबता त्याला पुढचं शिक्षण घ्यायचंय. पोलिसात भरती होण्याचा त्याचा मानस आहे. जमेल तसं तोही इथल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. गणेशलाही या परिस्थितीतून मार्ग काढून समाजात नवा बदल घडवायचाय. समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचं स्वप्न गणेशने उराशी बाळगलंय आणि शिक्षणानेच ही नवी दृष्टी गणेशला दिलीय. हीच तर शिक्षणाची खरी ताकद आहे, नाही का ?