
दोडामार्ग : तालुक्यातील वझरे येथील आंगन गृहप्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मोहन वासुदेव गवस (रा. कसई, गावठणवाडी) यांचा कर्तव्यावर असताना संशयास्पद मृत्यू झाल्याने दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर जखमांच्या खुणा आणि काळपटपणा दिसल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, घटनेची माहिती न देता कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह थेट ग्रामीण रुग्णालयात नेल्याने संतापाचा उद्रेक झाला. कोट्यवधींचा प्रकल्प, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि तरीही कॅमेरे बंद कसे? असा सवाल करत ग्रामस्थांनी कंपनीच्या बांधकाम व सुरक्षा व्यवस्थापनाला धारेवर धरले. सीसीटीव्ही फुटेज आणि सुरक्षा नोंदवही तात्काळ दाखवावी, तसेच या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन गवस हे गेल्या तीन वर्षांपासून आंगन प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी दोडामार्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम केले होते. गुरुवारी रात्री ते ड्युटीवर हजर झाले होते. रात्री १२ वाजून ३२ मिनिटांनी त्यांनी प्रकल्पाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर गेटजवळ उभे राहून काढलेला फोटो पाठविला होता.
त्यानंतर सकाळी कुडाळ येथून आलेली वाळूची गाडी प्रवेशद्वारावर थांबली. गेट उघडण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्याने चालकाने प्रकल्पातील शिंदे नामक व्यवस्थापकाला दूरध्वनी केला. त्यानंतर गवस हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळल्याचे सांगण्यात आले. व्यवस्थापनाने रुग्णवाहिका बोलावून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, जवळच नातेवाईक असतानाही त्यांना आणि पोलिसांना आधी माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित झाला. रुग्णालयात मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला.
सीसीटीव्ही बंद की घटनाक्रम लपविण्याचा प्रयत्न?
मृतदेहाच्या उजव्या बाजूला काळपटपणा, मानेखाली जखम आणि पायाच्या बोटाजवळ रक्तस्राव दिसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले. दुपारी दोनच्या सुमारास ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगण्यात येताच ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. एवढ्या मोठ्या प्रकल्पातील सुरक्षायंत्रणा बंद कशी, ती कधीपासून बंद आहे आणि त्याबाबत नोंदी आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. गवस यांनी बुधवारी रात्री कामावर जाताना दोन किलो चिकन नेल्याची माहिती विक्रेत्याने दिल्याचेही सांगण्यात आले. त्या रात्री प्रकल्पात काही कार्यक्रम झाला होता का, उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता का, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, या शक्यतांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट...
कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत जाहीर केल्याची माहिती प्रा. संदीप गवस यांनी दिली. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी, सध्या घातपाताचा संशय स्पष्टपणे दिसत नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे सांगितले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले. आता शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती, सुरक्षा नोंदवही आणि त्या रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी यातून या मृत्यूमागचे सत्य समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












