सोनू सूद येतोय कणकवलीत ; नितेश राणेंच्या दहीहंडीच्या उत्सवाला

Edited by: समीर सावंत
Published on: August 29, 2024 06:01 AM
views 391  views

कणकवली : माझे जवळचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील दहीहंडी उत्सवासाठी मी 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण या आणि दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटुया अशा पद्धतीचे आवाहन सिने अभिनेता सोनू सूद यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

   भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले "जय जवान गोविंदा पथक" सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४००  गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी स्पर्धेत मानवी मनोरे रचण्याचा थरार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

  जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ४३.१७ फूट उंचा पर्यंत मानवी मनोरे रचून विश्वविक्रम केलेला आहे. अशा या गोविंदा पथकाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गवासीयांची  उत्सुकता वाढली आहे.