LIVE UPDATES

महिलांनी शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी करा

तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 11:45 AM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : राज्यातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देऊन त्यांना विविध शासकीय योजना, कार्यक्रम, कृषी पतकर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीचे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

या अधिनियमामुळे महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीच्या मालकीचा निकष न ठेवता महिलेचा शेती व शेतीशी संबंधित कामांमधील प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेती व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या अधिकाधिक महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. अधिनियमातील ‘शेतकरी’ या व्यापक व्याख्येत पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण, कंपोस्ट निर्मिती यांसह विविध कृषी व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मक्तेदारीने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर व पशुचारक यांचाही समावेश करण्यात आला आहे.

 राज्यातील ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अर्ज पुढील नियमित ग्रामसभा किंवा या उद्देशासाठी आयोजित विशेष ग्रामसभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

ग्रामसभेने महिला शेतकरी म्हणून मान्यता दिल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायत क्षेत्रातील अर्ज पुढील सर्वसाधारण सभेत मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 सेवा संकल्प अभियानाच्या १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत कृषी विभागामार्फत या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र महिला शेतकऱ्यांची ओळख पटविणे, त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करणे, प्रशिक्षण व जनजागृती करणे यावर विशेष भर देण्यात येत आहे.

   तालुक्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.