
मुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विक्रम गायकवाड हे ५८ वर्षाचे होते. मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना गायकवाड आणि मुलगी तन्वी गायकवाड आहे. त्यांनी अनेक एतिहासिक सिनेमात रंगभूषकार म्हणून त्यांनी काम केलं होतं. आज संध्याकाळी ४.३० वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांना ७ वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
विक्रम गायकवाड यांना वर्षभरापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. मात्र त्यातून ते सावरले होते आणि पुन्हा कार्यरत झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर उपचरासाठी त्यांना पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज १० मे रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बालगंधर्व, काशीनाथ घाणेकर, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, झांशी, सुपर ३०, शहीद भगतसिंग, दंगल , पीके, केदारनाथ, पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल अशा अनेक चित्रपटात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. पावनखिंड , फत्तेशिकस्त, शेर शिवराज ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती. थ्री इडियट्स, भाग मिल्खा भाग, दंगल, संजू, पानिपत अशा दोनशेहून अधिक चित्रपटांचे ते मेकअप डिझायनर होते.