
दोडामार्ग : कोलझर येथे शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्याची सुरूवातच जल, जंगल संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. गाव आणि गावचे गावपण वाचवण्यासाठी पर्यावरण रक्षणाच्या गावाने केलेल्या एकजुटीच्या निर्णयाला यश येण्यासाठी बळ मिळावे असे साकडे यावेळी घालण्यात आले. कोलझर गावचा शिमगोत्सव यंदा निसर्ग रक्षणाच्या गावाने सुरू केलेल्या चळवळीमुळे वेगळी झळाली असलेला ठरला. या गावातील डोंगरातील जमिन काही बाहेरील गुंतवणुकदारांनी घेवून स्थानिकांना विश्वासात न घेता वृक्षतोड तसेच अवैध उत्खनन केले होते. हे सगळे स्थानिकांच्या मालकी जमिनीत अतिक्रमण करून करण्यात आले होते. याला गावाने एकत्र येत विरोध केला. भविष्यात येथील निसर्गावर घाला येवू नये यासाठी गावच्या जमिनी विकणार नाही असा संकल्प केला. कोलझर गावाने घेतलेल्या या भुमिकेचे राज्यभर कौतुक झाले होते. या पार्श्वभूमीवर येथील वार्षिक शिमगोत्सव झाला. या निसर्ग रक्षण चळवळीची किनार या मोठ्या उत्सवातही दिसली.
येथे सात दिवसांचा उत्सव असतो. यंदा काही अडचणीमुळे शिमगोत्सवाच्या सांगतेचा मुख्य सोहळा काल (ता.११) रात्री उशिरा झाला. न्हावाण (तीर्थ) सोहळ्याला या उत्सवात सर्वाधीक महत्त्व असते. यासाठी चाकरमानी तसेच माहेरवासिणी, पाहुणे स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवासमोर घातल्या जाणार्या गार्हाण्याला विशेष महत्त्व असते. या सोहळ्याची सुरूवातच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी गावाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी गावाने उचललेल्या पावलाला बळ मिळावे असे गार्हाणे घालून केले.
काय होते गार्हाणे
गावाने आतापर्यंत येथील जंगल, पाणी याच्या संवर्धनाची भुमिका पिढ्यानपिढ्या निभावली आहे. यावर संकट येत असल्याची जाणीव झाल्याने पूर्ण गावाने याच्या रक्षणासाठी एकजूट दाखवत तसा संकल्प केला आहे. गावचे गावपन जपण्यासाठी याची गरज आहे. पर्यावरणावर घाला घालणार्या, डोंगराची, येथील झर्यांची वाट लावण्याचा प्रयत्न करणार्यांना रोखण्यासाठी बळ मिळावे. येथील संस्कृती, गावपण याची विटंबना होवू नये यासाठी गाव करत असलेल्या प्रयत्नांना आणखी ताकद मिळावी. जंगलाची एकही काडी दुसर्या अशा स्वार्थी प्रवृत्तीकडे जावू नये. गावाने केलेला हा संकल्प अधिक मजबूत व्हावा. याबरोबरच हत्ती व इतर वन्य प्राण्यांपासून गावात होणारे नुकसान टळावे.










