
सिंधुदुर्गनगरी : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो आंबा-काजू बागायतदार सहभागी झाले. मोर्चा सुरू होत असतानाच राज्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी राणे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून योग्य मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी प्रतिनिधींनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, सरकारने येत्या २२ मार्चपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर २३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
घोषणांनी दणाणला परिसर
आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित मोर्चाची सुरुवात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सिंधुदुर्गनगरी फाटा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी निघाले.
भर उन्हात निघालेल्या या मोर्चात “जय जवान जय किसान”, “शेतकरी एकजूट संघटनेचा विजय असो”, “आंबा-काजूला हमीभाव द्या”, “एक शिट्टी राजू शेट्टी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले.
“कोकणात क्रांतीची सुरुवात” : राजू शेट्टी
सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की ही लढाई कोणाच्या विरोधातील नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची आहे. पर्यावरणातील बदलामुळे आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी शेतकरी जबाबदार नाहीत. त्यामुळे केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळाली पाहिजे.
आंबा उत्पादकांचे कर्ज ३१ मार्चला थकीत होण्याची शक्यता असल्याने विशेष बाब म्हणून कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना प्रति हेक्टर ५ लाख रुपये आणि काजू उत्पादकांना ३ लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती, त्यावेळी ७८ लोक होते; मात्र आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कमी लेखू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
“सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी” : नितेश राणे
सभेला संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, की गेल्या ५०-६० वर्षांत आंबा बागायतदारांवर असे संकट आले नव्हते. सरकारकडे नुकसानीचा अंतिम अहवाल प्राप्त झाला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
राजू शेट्टींसह शेतकरी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्यात येईल आणि केंद्र सरकारकडेही अधिक निधीची मागणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “सरकार कृतीच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
अनेक नेत्यांची उपस्थिती
या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, उद्योजक एम. के. गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास गावडे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व हजारो बागायतदार उपस्थित होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.










