
मालवण : नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेला मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा विद्यार्थी राहुल चव्हाण याचे ७ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून मालवणात आगमन होणार असून यानिमित्त मालवण शहरातून त्याची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख व असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांनी दिली आहे.
राहुल चव्हाण याला महाराष्ट्राकडून दिल्ली परेड साठी पाठवण्यात आले होते. त्याने महाराष्ट्राचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. डीजे एनसीसी मेजर जनरल तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल व अनेक मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. राहुल याचे ७ फेब्रुवारी रोजी मालवणात आगमन होणार असून यानिमित्ताने गौरव रॅली काढण्यात येणार आहे. कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर देऊळवाडा -भरड नाका - बाजारपेठे मार्गे फोवकांडा पिंपळ- कन्याशाळा ममार्गे सिंधुदुर्ग कॉलेज अशी रॅली काढण्यात येणार आहे.
तसेच कॉलेजमध्ये विविध संस्था व पदाधिकाऱ्यांच्याकडून राहुल याचा सन्मान सोहळा होईल. तरी मालवण पंचक्रोशीतील विविध संस्था, नागरिक, पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कृ.सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे, सीडीसी अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सर्व संचालक त्याचबरोबर सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी केले आहे.