सावंतवाडी तालुक्यात 69.50 टक्के मतदान

Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2026 22:27 PM
views 9  views

सावंतवाडी : तालुक्यात एकूण 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती  मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद व शेर्ले पंचायत समिती बिनविरोध झाल्याने जि.प.च्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागांसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 69.50 टक्के मतदान झालं. शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 1 लाख 4 हजार मतदारांपैकी सरासरी 70 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरूष व महिला यांचा समावेश आहे. मतदार राजाच मत मतपेटीत कैद झालं असून जनतेचा कौल कुणाला मिळतो ? हे सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.‌ त्यामुळे सर्वांच्या नजरा निकालाकडे लागून राहिल्या आहेत.

जिल्हा परिषदच्या 8 जागांसाठी 43 उमेदवार तर पंचायत समितीच्या 17 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान स्टोररूम मधून 143 केंद्रांवर 18 बसेस मधून मतपेट्या रवाना करण्यात आल्या होत्या. आदल्या दिवशीपासून सर्व मतदान केंद्रे निवडणूक विभागाने ताब्यात घेतली होती. सुमारे 768 मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस होमगार्ड , पोलीस कर्मचारी असे एकूण 1 हजार 268 अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी खास निवडणूक विभागाने नियोजन केले होते. माखडोल धवडकी शाळा नंबर 2 मध्ये 'सखी मतदान केंद्र' तर माजगाव शाळा नंबर एक मध्ये 'आदर्श मतदान केंद्र' उभारण्यात आली होती. ही दोन्ही केंद्र लक्षवेधी ठरली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी खास मतदान सुविधा ठेवण्यात आली. तालुक्यात एकूण 143 मतदान केंद्र असून या सर्व केंद्रांवर केंद्र अधिकारी तसेच 157 पथके तैनात होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक केंद्र अधिकारी व सहाय्यक कर्मचारी तसेच पोलीस होमगार्ड तैनात करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत होती.‌ तर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले होता. तालुक्यात सायंकाळपर्यंत 69.50 एवढे टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 11.11 टक्के, 11.30 पर्यंत 26.56 टक्के, दुपारी 1.30 वाजेपर्यंत 42.88 टक्के, सायंकाळी 3.30 पर्यंत 55.38 टक्के मतदान झालं. शेवटच्या टप्प्यात 5.30 वाजेपर्यंत 14 टक्के एवढं मतदान झाल असून मतदानाचा घटलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे व उबाठा शिवसेनेचे रुपेश राऊळ यांच्यात तर कोलगावाता भाजपचे महेश सारंग व अपक्ष मायकल डिसोजा यांच्यात काटेकीटक्कर होत आहे. माजगावातून भाजपचे विक्रांत सावंत आपल नशीब आजमावत आहेत. आंबोलीत भाजपच्या शोभा गावडे व शिवसेनेच्या सुप्रिया गावडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर, तळवडे पंचायत समिती मतदारसंघातू सभापती ठरणार असून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव, उबाठा शिवसेनेच्या श्वेता जाधव, अपक्ष काजल जाधव व प्रज्ञा जाधव रिंगणात आहेत.‌ त्यामुळे बाजी कोण मारत ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.