
सावंतवाडी : ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहातवर्षापासून यावर्षीही सोमवारी भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देशा सेवा मानवतेचा मार्ग हे अभियान राबवताना त्याचे महत्त्व स्पष्ट करून याबाबतच्या पत्रकांचे यात्रेकरूंना वितरण केले.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी ही सामाजिक संस्था २०१२ पासून आपल्या सामाजिक सेवेचे व्रत जोपासत आहे. शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट-हिमोग्लोबिन तपासणी, ग्रामीण भागात आयोजित केले जाणारे आरोग्य शिबिरे, सावंतवाडी तालुक्यातील ८ गावात सुरू असलेला फिरता दवाखाना, जिल्ह्यातीलच नव्हे तर गोव्यातील रुग्णांना आधार ठरलेलं डॉ डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र यासारखे आरोग्य विषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य, स्कुल किट व इतर शैक्षणिक साहित्य वाटप, २३ प्रशालेत "शब्दगंध" योजनेंतर्गत वाचनालय ई शैक्षणिक उपक्रम प्रतिष्ठान राबवित आहेच.
या शिवाय २०१३ पासून कोलवाळ, गोवा येथे जनजागरण सुद्धा करण्यात येत आहे. ३ डिसेंबर म्हणजे गोव्याच्या साहेबाचा फेस्त. यानिमित्त्य सिंधुदुर्गातील अनेक ख्रिस्ती बांधव ओल्ड गोवा चर्च पर्यंत पदयात्रा करतात. या पदयात्रेकरुंमध्ये सिंधुमित्र प्रतिष्ठानद्वारे विविध विषयांवर जनजागृती करण्यात येते. पहाटे ३ च्या सुमारास कार्यकर्ते गोव्याच्या दिशेने निघून पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत हा उपक्रम चालतो. आजवर राष्ट्रप्रथम, आयुर्वेद चिकित्सा पद्ध्ती, प्लास्टिक मुक्त धरणी, वृक्षारोपण व पर्यावरण, लेक वाचवा-लेक शिकवा ई विषयांवर जनजागरण अभियान राबविण्यात आले आहे.
ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसांची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मड्डुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासून गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्यावतीने इलियास फर्नाडिस, फादर थॉमस फर्नांडिस, अँड्र्यु डीमेलो, जेम्स डिसोजा, जॅकी फेराव मायकल डिसोजा मारिया डिसोजा मिशन फर्नांडिस यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विशाल पाटील, भार्गवराम शिरोडकर, गुरुनाथ राऊळ, श्रीकांत दळवी, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, फ्रँकलिन फर्नांडिस यांनी नियोजन केले होते.
यावर्षी प्रतिष्ठान मार्फत यात्रेकरून साठी "देश सेवा - मानवतेचा मार्ग" हे जनजागरण अभियान राबविण्यात आले. 'मानव सेवा हिच ईश्वर सेवा' हे ब्रीद घेऊनच आपल्या देशाची सामाजिक वाटचाल सुरू आहे. देश आहे म्हणून मानव सुरक्षित आहे. आणि मानव सुरक्षित आहे म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे. मानव सेवा करून आपण राष्ट्र सेवा म्हणजेच देश सेवा करू शकतो, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. सर्व ख्रिस्ती बांधवांनी यात हिरीरीने सहभाग नोंदविला. या वेळी येशू ख्रिस्तांनी दिलेला मानव संदेश, आपल्या पलीकडे जाऊन दुसऱ्याची सेवा करावी, ती सुद्धा निस्वार्थी भावनेने सर्वांना वितरित करण्यात आला.














