
सावंतवाडी : विनायक गांवस सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. कुणी कितीही नाकारलं तरी वास्तव लपून राहील नाही. भारतीय जनता पार्टी व शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला, असं बोललं जातंय. मात्र, एवढं असूनही कॉग्रेस अन् उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे सावंतवाडीकरांची साथ जनशक्तीलाच असल्याचे यातून स्पष्ट झालंय.
20 हजार मतदार असणाऱ्या सावंतवाडीची यंदाची नगरपरिषद निवडणूक भाव खावून गेली. भाजपकडून मतदारांना पैशांच वाटप होत असल्याचा आरोप त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेकडूनच केला गेला. हा आरोप कुण्या नवख्यान नव्हे तर दस्तुरखुद्द माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंसारख्या बड्या नेत्यांनी केला. श्री. केसरकर म्हणाले, १७-० करताना देखील एवढा पैशांचा वापर आमच्याकडून झाला नव्हता. तेव्हा समोर पैशांचा वापर करणारी विरोधी अशी कोणी पार्टी नव्हती. आताच चित्र बघता जनतेनं भाजपचे पैसे घेऊन मतदान शिवसेनेला करावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं.याबाबत भाजप नेते पालकमंत्री नितेश राणेंना विचारलं असता ते म्हणाले होते की, केसरकर बोलतायत का की कोण पैसे वाटतायत ? चुकीची बाब आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे, राज्य निवडणूक आयोगाकडे द्यावे. माजी मंत्री, आमदार स्वतः हे स्वीकारतायत की पैसे वाटतायत, ही अतिशय गंभीर बाब आहे. मी पोलिसांना त्यांचं वक्तव्य तपासायला सांगेन असं विधना पालकमंत्र्यांनी केलं होत.
दरम्यान, वस्तूस्थिती बघता भाजपच्या या वाटपाला शिवसेनेनही वाटपातूनच उत्तर दिलं हे देखील तेवढंच सत्य आहे. कोट्यावधींचा पाऊस या निमित्ताने शहरात पडला. सामान्य नागरिकांनी देखील यावेळी थोडी वेगळी परिस्थिती होती असं बोलूनही दाखवलं. हा पॅटर्न चुकीचा असून रात्रीच्या अंधारात हे काम होत. जाणकार मतदार म्हणून या गोष्टी उजेडात आल्या पाहिजे. निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली पाहिजे असं मत मतदार राजांन व्यक्त केलय. यातच काही व्हिडिओच सोशल मिडियावर व्हायरल झालेत. घरी पैसे घेऊन आलेले कार्यकर्ते, बुथवर पैसे वाटप होतय म्हणून शिवसेना आणि भाजपात झालेल भांडण चर्चेत आहेत.
मात्र, या धनशक्तीच्या लाटेतही विरोधी गटाचे दोन नगरसेवक विजयी झालेत. पैसे न वाटता जिंकलो, बिना पैशाच मतादन केलं त्याबद्दल मतादारांचे आभार मानत कामाच्या स्वरूपात ऋण फेडू असं मत उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी व्यक्त केले. तर, लोकांनी धनशक्तीला लाथ मारत मला संधी दिली. लोकांची कामं न झाल्यानं मला निवडून दिल. धनशक्तीला कंटाळून आज त्यांनी कॉग्रेसला संधी दिल्याचे विधान नगरसेवक तौकीर शेख यांनी केले.
एकंदरीतच, सावंतवाडीत पैशांचा पाऊस पडला हे नाकारून चालणार नाही. एका मताला १० हजार तर काही ठिकाणी २५ हजारचा आकडा होता हे आता मतदार राजाच बोलून दाखवू लागलाय. 'ऑन रेकॉर्ड' बोलण्यास मात्र तो कचरतोय. तर दुसरीकडे, वाटप करणारे पक्षाचे काही कार्यकर्ते उच्चशिक्षित, सधन लोकांनीही मतांचे पैसे मागून घेतल्याचे बोलतायत. चौका चौकात, नाक्यावर हीच चर्चा सध्या रंगतेय. त्यामुळे या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला, खिसे गरम झालेत हे स्पष्टच होतय. काहींनी तर दरवर्षी अशा निवडणूका होवोत म्हणून साकडं घातलंय. परंतु, धनशक्तीला नाकारत मतदारांनी मतदान केल. एवढंच नव्हे, तर धनशक्तीला नाकरताना मतदान यंत्रावर उपस्थित होणाऱ्या शंकाही पुसुन टाकल्यात. निवडणूक आयोगाला एकप्रकारे ही क्लिन चीटच दिली गेलीय. सरतेशेवटी एवढंच की, सावंतवाडीकरांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीच भारी हे दाखवून दिलय.














