
सावंतवाडी : शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाला आहे. शहरातील मोजक्या चार इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी तलावात सोडले जात आहे. परिणामी पाण्याला दुर्गंधी येत असून हा प्रकार येत्या आठ दिवसात बंद झाला पाहिजे. अन्यथा, गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांना दिला. तर संबंधित इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या असून तेथील रहिवाशांची बैठक तात्काळ घेऊन ड्रेनेज बंद करण्याची सूचना देण्यात येणार आहे. अन्यथा संबंधावर कडक कारवाई करण्यात येण्याची ग्वाही यावेळी मुख्याधिकारी सौ पाटील यांनी दिली.
जिल्हाप्रमुख श्री परब यांनी आज पालिकेमध्ये धडक देत मुख्याधिकारी यांना मोती तलावातील स्वच्छते संदर्भात जाब विचारला. यावेळी विनोद सावंत, सुधा कवठणकर, महेश पांचाळ,परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे मोती तलावाच्या स्वच्छते संदर्भात पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. शहरातील काही मोजक्या चार इमारती कडून ड्रेनेजचे पाणी थेट मोती तलावात सोडण्यात आले आहे. शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाचा यावर लक्ष नसल्याने हा प्रकार घडत आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन त्याच्या दुर्गंधीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सावंतवाडी मोती तलाव हे शहराचे सौंदर्य आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलेले आम्ही कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे ड्रेनेजचा प्रकार येत्या आठ दिवसात बंद झाला पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची ही दुर्दशा झाली असून त्याकडेही पूर्णतः दुर्लक्ष झाला आहे. शहरातील स्वच्छतागृह ताप टीप असले पाहिजे याकडेही लक्ष द्या अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. दरम्यान या संदर्भात आपण जातीनिशी लक्ष घालणार असून संबंधित इमारतींना या अगोदरच नोटिसा बजावण्यात आला आहे. तरीसुद्धा संबंधित इमारतीमधील रहिवाशांची तातडीची बैठक घेऊन त्यांना ट्रीटमेंट प्लॅन सुरू करण्याची सूचना करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी पालन केल्यास त्यांच्यावर प्रसंगी कडक कारवाईची भूमिका ही घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी सौ पाटील यांनी सांगितले.