
सिंधुदुर्गनगरी : नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी होत असलेल्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई आदी उपस्थित होते.
राणे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्याने त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस जिल्ह्यात विशेष स्वरूपात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. ‘संसद कोकण समृद्धी महोत्सवा’तर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात विविध राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धा विनाशुल्क व खुल्या असून विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
तालुकानिहाय स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
कणकवली : ५ एप्रिल – बॅडमिंटन स्पर्धा (विविध गट)
देवगड : ५ एप्रिल – सायक्लोथॉन स्पर्धा
दोडामार्ग : ८ एप्रिल – कबड्डी स्पर्धा
वैभववाडी : १० एप्रिल – कुस्ती स्पर्धा
कुडाळ : १० एप्रिल – आंतरराज्यीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा
सावंतवाडी : १० एप्रिल – टेबल टेनिस स्पर्धा
मालवण : १० व ११ एप्रिल – बास्केटबॉल डे-नाईट स्पर्धा
वेंगुर्ला : ११ व १२ एप्रिल – व्हॉलीबॉल स्पर्धा
या क्रीडा महोत्सवाचे संयोजन प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात प्रथमच एवढ्या व्यापक स्वरूपात क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ हा जिल्ह्यासाठी एक संस्मरणीय सोहळा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.












