
सावंतवाडी : उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही तातडीने स्पष्ट करा, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी केली आहे.
वनविभागाच्याच आवारात झालेल्या या झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. मुळीक यांनी थेट उपवनसंरक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला आहे.या वृक्षतोडीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत ही कारवाई कोणत्या नियमांतर्गत झाली ? त्यामागील नेमके कारण काय ? याची अधिकृत माहिती वनविभागाने तात्काळ द्यावी, असे उपसभापती श्री. मुळीक यांनी पत्रात नमूद केले आहे. आता वनअधिकारी यावर काय स्पष्टीकरण देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










