'त्या' वृक्षतोडीवर वनविभागाची सारवासारव

परशुराम उपरकरांकडून दखल ; वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 20:15 PM
views 14  views

सावंतवाडी : वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात वन शहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभासह उद्यान नुतनीकरणासाठी काही जीर्ण झालेली झाडे हटविण्यात आली. परवानगी घेऊन झाड तोडल्याची माहिती सावंतवाडी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांना दिली. झाडांची कत्तल केल्याचा जाब विचारला असता त्यांनी ही सारवासारव केली. 

वनविभागाच्या कार्यालयात असलेली झाडे नेमकी कोणत्या कारणासाठी तोडली ? त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली ? पुढे या ठिकाणी काय केले जाणार ? याची सखोल माहिती द्यावी अशी मागणी श्री. उपरकर यांनी वनविभागाकडे केली. तसेच याबाबत आपण वनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख राजू शेटकर, आशिष सुभेदार, संतोष सावंत, आबा चिपकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री उपरकर यांनी आपण याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहीती मागितली आहे. तसेच तोडलेल्या वृक्षाबाबत वनसंरक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणी जबाबदार कोण ? याची माहिती द्या, अशी मागणी केली. 


यावेळी ध्वजस्तंभ आणि वनशहीदांचे स्मारक उभारण्यासाठी तसेच उद्यान नुतनीकरणासाठी जीर्ण झाडे तोडण्यात आली‌. उद्यानातील झाडे तोडून आता त्या ठिकाणी नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे काही झाडे तोडावी लागली असून याबाबत परवानगी घेतली होती असे वन अधिकारी श्री. लाड यांनी सांगितले.