सावंतवाडीत ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलन’

अजय कांडर अध्यक्षपदी, वीरधवल परब यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: March 25, 2026 21:08 PM
views 12  views

सावंतवाडी : मराठी नाट्यसृष्टीतील ‘जाता नाही जात’ यांसारख्या वैचारिक नाटकाचे प्रणेते, संवेदनशील कवी आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी यावर्षीपासून ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून, या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी अजय कांडर भूषवणार आहेत.


प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळली. प्रेमानंद गज्वी यांच्या कार्यशाळेतून आकाराला आलेले आणि ‘आविष्कार’सारख्या प्रतिष्ठित संस्थेने रंगभूमीवर आणलेले ‘जाता नाही जात’ हे नाटक मराठी नाट्यपरंपरेतील एक मैलाचा दगड ठरले. तांबे यांची ‘आंबेडकर चौक’ ही कविता त्यांच्या साहित्यिक ओळखीचा केंद्रबिंदू ठरली. त्यांच्या अकाली निधनानंतर, त्यांचे साहित्यिक मित्र विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांनी तांबे यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी या संमेलनाची संकल्पना मांडली आहे.

अजय कांडर अध्यक्षपदी, वीरधवल परब यांची प्रमुख उपस्थिती

या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ कवी अजय कांडर यांचे काम मराठी साहित्यात मोलाचे आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवार्थ त्यांनी लिहिलेली ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता आणि त्यावर आधारित नाट्यप्रयोग सध्या राज्यभरात चर्चेत आहेत. त्यांचा हाच वैचारिक पिंड आणि सिद्धार्थ तांबे यांच्याशी असलेला जिव्हाळ्याचा स्नेह लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी वीरधवल परब उपस्थित राहणार आहेत. राज्य शासन आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांनी सन्मानित असलेले परब हे विद्रोही चळवळीतील एक प्रगल्भ साहित्यिक असून, ते सिद्धार्थ तांबे यांचे निकटवर्तीय मित्र होते.

१२ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनात कोकणातील साहित्यिकांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. सिद्धार्थ तांबे यांच्या साहित्याला आणि विचारांना उजाळा देणारे हे पहिलेच संमेलन असल्याने सिंधुदुर्गातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.