प्राणीमित्रांनी स्वीकारली बदकांची जबाबदारी

न.प.आरोग्य विभागानं केली सोय
Edited by: विनायक गावस
Published on: May 29, 2023 19:55 PM
views 197  views

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावातील गाळ उपसा दरम्यान पाणी सोडल्यामुळे तलावातील बदकांची अवस्था न बघण्यासारखी झाली होती. मुक्या जीवांना वाली कोण ? हा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, या बदकांची सावंतवाडीतील प्राणी मित्रांनी जबाबदारी घेत त्यांचं संगोपन करण्यासाठी बदक आपल्या ताब्यात घेतली आहेत. पावसाळा येईपर्यंत व तलाव पुर्ण भरेपर्यंत एकुण ८ बदकांच संगोपन ते करणार आहेत.


गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करत असताना या बदकांचा विचार केला गेला नाही. यात तलावातील मासे देखील मृत्यूमुखी पडलेत. तर पाणी नसल्याने चिखलात मळलेली पांढरीशुभ्र बदक बघवत नव्हती.  त्या बदकांच काय असा सवाल कोकणसादनं करत या बदकांच्या गैरसोयीबाबतची कल्पना आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर यांना दिली होती. त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून त्या बदकांची तातडीने सोय करण्यासाठी उपययोजना सुरू केली. दरम्यान, गाळ उपसा दरम्यान ही बदक करोल आवाट येथील प्राणीमित्र आरीफ करोल, कयाज बेग यांच्याकडे वास्तव्यास राहणार आहेत. त्यांनी या बदकांची जबाबदारी स्वीकारत त्यांना निवारा दिला आहे. त्यामुळे उकाड्यात पाणी नसताना चटके सोसणाऱ्या या बदकांना आता यातना सहन कराव्या लागणार नाही आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत व मोती तलाव पूर्ण भरेपर्यंत या बदकांच संगोपन हे प्राणीमित्र करणार आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा ही बदक मोती तलाव सफर करताना दिसणार आहेत.

या बदकांची सोय करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर यांसह न.प‌. कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पाण्याविना उन्हाचे चटके सोसणाऱ्या या बदकांची सोय केल्यान प्राणीमित्र आरीफ करोल, कयाज बेग व न.प.च कौतुक केले जात आहे.