
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव मानला. मात्र, ते धर्मनिरपेक्ष नव्हते. ते सेक्युलर नव्हते याची अनेक उदाहरणे देता येतील. स्व-धर्माचा, स्व-भाषेचा अभिमान राखण्याचं काम त्यांनी केलं. म्हणूनच, त्यांच्या काळातला महाराष्ट्र हा ऐश्वर्यसंपन्न होता, असं मत शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित शिवजागराच्या ९ व्या पुष्पात ''धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज" यावर विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना त्यांनी संबोधित केलं.
डॉ. शेटे म्हणाले, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध एवढी धर्माची व्याख्या मर्यादीत नाही. धर्म नसता तर माणूस स्वैर वागला असता. धर्माची सुरूवात गर्भसंस्कारापासून होते. वडील लखोजी राजेंवर निजामशाहीन हल्ला करत वध केल्यानंतर पोटूश्या असलेल्या जिजाऊंनी स्वराज्याची शपथ घेतली, धर्म इथून सुरू होतो. धर्म एकाएकी रूजला जात नाही. आई- वडीलांचे संस्कार देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात. १३ सवंगड्यांसह शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदीरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सेक्युलर ही संकल्पना आताची आहे. शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव मानला. पण, ते धर्मनिरपेक्ष नव्हते. अफजाल खानाचा वध केल्यानंतर इस्लामच्या प्रथेनुसार त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करणारे शिवाजीराजे होते. शत्रूच्या पार्थिवाची विटंबना नको, मरणानंतर वैरत्व संपलं हे मानणारे छत्रपती होते असं सांगितलं.
तसेच परमुलखावर हल्ला करताना तेथील लोकांच्या धर्मस्थळांना हात लावू नका असे निर्देश मावळ्यांना देणारा आपला राजा होता. हल्ल्यात देखील तत्व जोपासणारा एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती आहे. डच अर्थात ख्रिश्चन विधवा स्त्रीच रक्षण करणारे आपले राजे होते. इतर धर्मीयांचा आदर राखण्याचं काम त्यांनी केलं. मात्र, शिवाजी महाराज हे धर्मांतराच्या विरोधात होते. गोव्यात हिंदूंच्या छळ करून धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या चार पादरींचा शिरच्छेद करणारे शिवबा होते. त्यांनी परधर्मीयांचा आदर राखला. मात्र, हिंदू धर्मावरच आक्रमक सहन केलं नाही. हा इतिहास देखील जगाला सांगितला गेला पाहिजे. हिंदूवर जीझीया करा लादला त्यावेळी औरंगजेबाला निषेधाच पत्र लिहीणारे महाराज होते. दक्षिण दिग्विजयावेळी १२ ज्योतीर्लिंगापैकी एक मल्लिकार्जुनाच दर्शन घेतलं. शिरकमल अर्पण करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चिंचू जमातीच्या वाटाड्यान घरातलं लग्न बाजूला ठेऊन महाराजांना तिरूपती दर्शन घडवून आणल. दक्षिण भारतात देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं स्थान दिलं. तसेच मशिदीत परिवर्तीत झालेली मंदीर पुन्हा मंदीरात रूपांतरीत करण्याच काम केल. गोव्यातील हरिहरेश्वर मंदीराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. हिंदू धर्मातील परिवर्तीत झालेल्या बाटग्याला पुन्हा धर्मात प्रवेश नव्हता. मात्र, हा सनातनी कर्मठ रूढीवाद महाराजांनी मोडून काढत सरनोबत नेताजी पालकर यांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करून घेतला. प्रति शिवाजी अशी ओळख त्यांची होती. मुघलांनी त्यांना मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. महंमद कुली खान असं त्यांचं नामांतरण केलं. १० वर्ष त्यांनी इस्लाम धर्म जगला. त्यानंतर औरंगजेबान त्यांना दिलेरखानासह महाराष्ट्रात पाठवलं. महाराष्ट्र येताच सह्याद्री बघून रायगडावर महंमद कुली दाखल झाला. पुन्हा जात गंगेत घ्याल का ? अशी मागणी त्यांनी राजांकडे केली. १९ जून १६७६ ला वेदमंत्र उच्चारात महंमद कुली खानला पुन्हा नेतोजी पालकर यांना हिंदू धर्मात प्रवेश करुन घेतला. एवढंच नव्हे तर नेताजी पालकर यांच्या मुलाला जानोजीला हिंदू धर्म प्रवेश देत स्वतःच्या मुलीचा विवाह करून दिला. आजही ५०० वेळा आपण विचार करू. मात्र, छत्रपतींनी त्यावेळी हे करून दाखवल. म्हणूनच, शिवाजी महाराज धर्मरक्षक आहे. गोमाता, भगव्याच रक्षण, देवळांच रक्षण एवढंच धर्मरक्षण नाही असं प्रतिपादन केले.
दरम्यान, शहाजीराजेंच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती जात होत्या. समोर चिता रचली गेली होती. मात्र, शिवरायांच्या शपथेनंतर त्यांनी सती जाण टाळलं. सती प्रथा बंद करणारा क्रांतिकारक राजा या महाराष्ट्रात होऊन गेला. महाबळेश्वरला आईची सुवर्ण तुला करून गोरगरीबांना त्यांनी वाटप केल. एवढंच नाही तर सोनोपंत डबीरांचाही तुलादान त्यांनी केला. त्यामुळे महाराज सेक्युलर नव्हते याचे अनेक पुरावे देता येतील असं मत डॉ. शेटे यांनी व्यक्त केले. भोसले कुळात स्पटीकाच शिवलिंग समान दिसते. धर्मनिरपेक्ष असते तर गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला नसता. १ कोटी ४२ लक्ष होन खर्च झाल्याची बखरित नोंद आहे. मराठ्यांचा राजा छत्रपती झाला. धर्मनिरपेक्ष असते तर या गोष्टी केल्या नसत्या. इतर धर्मांचा आदर राखणारे शिवराय होते. मात्र, ते धर्मरक्षकच होते. मराठी भाषा प्रदुषित होताना भाषेचं शुद्धीकरण करण्याच पहिलं काम त्यांनी केलं. अनेक फारसी शब्दांना त्यांनी पर्यायी शब्द दिले. स्वधर्माचा, स्वभाषेचा अभिमान राखण्याच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिंधुमित्र प्रतिष्ठानकडून गोवंश रक्षणासाठी लढणारे ॲड. पलाश चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण विभाग प्रमुख लवू महाडेश्वर, ॲड. पलाश चव्हाण, माजी नगरसेवक उदय नाईक, युवराज लखमराजे भोंसले, अच्युत सावंत भोंसले, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, ॲड. शामराव सावंत, डॉ विशाल पाटील, आसिफ शेख, प्रसाद सापळे, केदार बांदेकर, लक्ष्मण नाईक, दीपक गांवकर, आनंद मेस्त्री,
सिद्धेश मनेरीकर, प्रशांत कवठणकर, भगवान रेडकर, संतोष नाईक, निलेश माणगावकर, डॉक्टर मुग्ध ठाकरे, अनघा शिरोडकर, भार्गवराम शिरोडकर, विनय वाडकर, ॲण्ड्रू फर्नांडिस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केल. सूत्रसंचालन डॉ. राहुल गव्हाणकर ,तर आभार गुरूनाथ राऊळ यांनी मानले.










