
कुडाळ : दिनांक ९ जानेवारी रोजी तेंडोली गावठण शाळेचे छप्पर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर शिक्षण विभागाने तातडीने हालचाल करत मुलांच्या शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाचे हे आश्वासन हवेतच विरल्याचे आज दिसून आले. सोमवार उजाडला तरी कोणतीही ठोस व्यवस्था न झाल्याने अखेर चिमुकल्या विद्यार्थ्यांना भर उन्हात बसून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत.
आश्वासन ठरले फोल
शाळेचे छप्पर कोसळल्यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यावेळी शिक्षण विभागाने 'मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, तातडीने दुसरी सोय करू' असे सांगितले होते. मात्र, आज प्रत्यक्ष शाळा भरली तेव्हा मुलांना बसण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. नाइलाजास्तव शिक्षकांनी शाळेच्या आवारातच उन्हात वर्ग भरवले.
पालकांचा संतप्त सवाल
भर उन्हात बसलेल्या आपल्या मुलांची अवस्था पाहून पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. "शिक्षण विभाग खरोखरच निद्रिस्त अवस्थेत आहे का?" असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. "शाळेचे छप्पर कोसळणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होते. उन्हात बसून मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ही व्यवस्था तातडीने सुधारली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू.असे संतप्त पालकांचे म्हणणे होते.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन शिक्षण विभाग तत्काळ हलगर्जीपणा थांबवून विद्यार्थ्यांना सुरक्षित छप्पर मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










