
सिंधुदुर्गनगरी : गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश दिले असून कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी आज अखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसात कॅमेरे बसवण्याबाबत विभागीय मंडळाने सूचना दिल्या आहेत. गैरप्रकार मुक्त परीक्षेसाठी चालू वर्षी सर्वच परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. दरम्यान सोमवार 12 जानेवारीपासून बारावीचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शासन निर्णय 13 मे 2025 अन्वये शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी व इ.१२वी परीक्षांसाठी निश्चित केलेल्या सर्व परीक्षा केंद्रावर व परीक्षेशी संबधित सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे राज्यमंडळाचे पत्र 9 डिसेंबर नुसार अनिवार्य आहे. तसेच परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत केंद्र असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून कॅमेरे बसविले असल्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज जतन करुन ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात येणार असून कोणतेही गैरप्रकार होवू नये यासाठी विभागीय मंडळाकडून व जिल्हा प्रशासनाकडून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. विभागीय मंडळांतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीचे ऑनलाईन फुटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती यांचेकडे देण्यात येणार आहे.परीक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यमंडळ व विभागीय मंडळ कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षातून कॅमेराव्दारे किती संवेदनशील परीक्षा केंद्रांना जोडता येईल याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून येतील तेथे तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व केंद्रावर परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही राज्यमंडळाचे पत्र ५ डिसेंबर नुसार करण्यात येणार आहे. त्यास अनुसरून शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रशासनाच्या उपक्रमाने राज्यातील इ.१०वी व इ.१२वी परीक्षार्थी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा सहभाग घेऊन परीक्षा पे चर्चा या सारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मागील परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १० परीक्षेत भरारी पथकामार्फत एकही गैरमार्ग प्रकरण निदर्शनास आलेले नव्हते. तर बारावीच्या एका केंद्रावर एकमेव कॉपी प्रकार निदर्शनास आला होता. इ. १० वी व इ.१२वी च्या एकाही परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता रद्द करण्यात आलेली नाही. चालू वर्षी एकाही केंद्रास नव्याने मान्यता देण्यात आलेली नाही. या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत एकुण १७५ केंद्रे असून त्यापैकी १० वी साठी ११४ व इ.१२ वी साठी ६१ केंद्रे आहेत. परीक्षेसाठी ३,०४० वर्गखोल्यांची आवश्यकता असून त्यापैकी १७१२ खोल्यांमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित १३२८ वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या संस्थाचालकांना निर्देश देण्यात आले आहेत.
चालू वर्षी जिल्हा स्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती काम करणार आहे. त्यात वीज वितरण चे कार्यकारी अभियंता यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला असून इ.१२वी साठी २१ जानेवारी व इ.१०वी साठी ३० जानेवारीपर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म भरता येणार आहे. यापूर्वी आदल्या दिवसापर्यंत परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करता येत होते. 10 जानेवारीअखेर कोकण विभागीय मंडळात इ.१० वी साठी २५,७४८ परीक्षार्थ्यांनी व इ. १२ वी साठी २३,९९४ आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरले आहे.
चालू वर्षी विभागीय मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्ड परीक्षेचे कामकाज नियोजनबद्ध करता यावे यासाठी "बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे" या नाविन्यपूर्ण पुस्तिकेची निर्मिती केली असून त्यात शाळांनी महिनानिहाय करावयाचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज देण्यात आले आहे. तसेच विशेष उपक्रम घेण्यात येत आहेत. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातारणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, सहपालकमंत्री, अन्य लोकप्रतिनिधी, पालकसचिव, स्थानिक प्रतिष्ठित नागरीक व नामांकित प्रसिध्दी व्यक्ती यांच्यामार्फत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी आवाहन करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार संबंधित मान्यवरांना विनंतीपत्र देण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी सांगितले. "परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे, शाळा स्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. अशी माहिती कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.विभागीय अध्यक्ष,राजेश क्षीरसागर यांनी दिली.










