संकल्प इंटरप्राईजेसचा झोल | तपास गोल गोल..?

अर्चना घारेंचे खडे बोल
Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 12:18 PM
views 74  views

सावंतवाडी : संकल्प इंटरप्राईजेसच्या माध्यमातून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून कित्येक कोटी रुपयांची मालमत्ता जमा करण्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसात स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी काही दखल घेतली नाही. त्याप्रमाणे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व प्रकार सांगण्यात आला. तरीही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या कंपनीला पोलीस संरक्षण देत आहेत आणि त्याला सरकार जबाबदार आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केला. 

अर्चना घारे-परब म्हणाल्या, काही महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसच्या बाजूला संकल्प एंटरप्राइजेस येथे अनेक दिव्यांग व्यक्ती रोज येत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यांना बोलून विचारल्यावर त्या व्यक्ती म्हणाल्या आम्हाला हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी मी संबंधित कंपनीच्या पाटील नामक व्यक्तीला बोलावून घेतले.याबाबत त्याला काही माहिती विचारली परंतु त्यांनी दिलेली माहिती विसंगत होती. त्याचवेळी मी तक्रार केली. त्यानंतर हे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र, या प्रकरणी आम्ही मुळाशी जाणार आहोत संबंधित कंपनीच्या काही लोकांनी 29 फेब्रुवारी पर्यंत लोकांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसे न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. यांनी गोरगरीब लोकांचा एक रुपया जरी फसवला तर आम्ही महिला त्यांना चौकात फटके देऊ असे इशारा घारे यांनी दिला.

संकल्प इंटरप्राईजेस मार्फत 50 हजार रुपये घेऊन 5 लाख रुपये देतो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र पोलीस यांना पाठीशी घालत आहेत. कुठेतरी सरकारचा दबाव या मागे असल्याचं जाणवतं. आमिश दाखवून फसविणारे हे सरकार असून फसवणूक करणाऱ्यांच्या मागे असून भष्टाचार करणाऱ्यांना पाठिंबा देत आहे. हा सर्व भ्रष्टाचार पोलिसांच्या मदतीने केला जात आहे असा आरोप माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी केला. यावेळी अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी, देवा टेंमकर, अॅड. सायली दुभाषी, पुजा दळवी, सावली पाटकर, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.