
दोडामार्ग : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, झोळंबे येथे ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत ‘बांधावरची शाळा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन झोळंबे येथील शेतकरी श्री. संजय वसंत गवस यांच्या शेतामध्ये करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव घेत शेती जीवनाचे महत्त्व जाणून घेतले.
या उपक्रमात झोळंबे ग्रामपंचायत उपसरपंच विनायक गाडगीळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुखाजी गवस, माजी सैनिक गजानन गवस, पोलीस पाटील संजय गवस, ग्रामपंचायत सदस्या संजना गवस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गवस, मुख्याध्यापक प्रवीण देसाई, शिक्षक संतोष गवस, विशाल माने, दिनेश जाधव, तसेच पालक प्रमोद गवस, शिवराम गवस आणि सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमात मुख्याध्यापक प्रवीण देसाई - यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती तयार करणे, बी पेरणी, पाणी देणे, कोळपणी यांसारखी विविध शेतीची कामे प्रत्यक्ष केली. पारंपरिक शेती व यांत्रिक शेती यामधील फरक, तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये झालेला बदल याबाबत शिक्षक संतोष गवस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शेवटी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतकरी जीवनाची, कष्टाची आणि अन्ननिर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख झाली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.