
सावंतवाडी : तालुक्यातील पडवे धनगरवाडी येथील ग्रामस्थ महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त होऊन आज अखेर त्यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा इशारा महावितरणला दिला. 2018 साली झालेल्या वादळात संपूर्ण वाडीतील विजेचे पोल व वाहिन्या तुटून पडल्या होत्या. ती दुरुस्त करण्याच्या नावाखाली केवळ सिंगल लाईन वरून संपूर्ण वाडीला विजपुरवठा देण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण वाडीला वीज समस्येचा सामना करावा लागत असून, याबाबत वारंवार पत्रव्यवहार व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती करून देखील मागील आठ वर्षे केवळ आश्वासने देण्यात आली.
आता तर दिवसातून केवळ एक ते दोन तास ती देखील अतिशय कमी दाबाने वीज उपलब्ध केली जाते. अशा सर्व समस्यांना कंटाळून आज पडवे धनगरवाडी ग्रामस्थ प्रतिनिधींनी महावितरणचे कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेऊन सर्व ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन देत 26 जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
यावेळी बोलताना ग्रामस्थ रवींद्र शिंदे यांनी सांगितले की, वारंवार पाठपुरावा करून देखील समस्यांकडे लक्ष दिले जात नाही यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. याबाबतचे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देखील देणार असून आमची विजेची समस्या 26 जानेवारी पूर्वी न सोडवल्यास आमची संपूर्ण धनगरवाडी उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली.यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून रवींद्र शिंदे, विनय शिंदे व भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर उपस्थित होते.










