
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांचा त्यांच्या जन्मगावी निगुडे येथे भव्य व आत्मीय सत्कार करण्यात आला. गावच्या ग्रामदैवत श्री माऊली देवीच्या मंदिरात देवस्थान कमिटी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व मानाची टोपी घालून हा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी देवस्थानचे मुख्य मानकरी शांताराम गावडे, भाऊ गावडे, रवी गावडे, समीर गावडे, दिगंबर गावडे, नाना खडपकर, आत्माराम गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या उपस्थितीने व वातावरणातील आत्मीयतेने हा सत्कार अधिकच भावूक ठरला. सत्काराला उत्तर देताना श्री. गावडे म्हणाले, “माझ्या जन्मगावी दुसऱ्यांदा मला सन्मान मिळतोय, ही बाब माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे. गावाने दिलेला हा मान माझ्या कायम स्मरणात राहील.
गावाचे प्रेम, विश्वास व सदिच्छा अशाच पाठीशी राहाव्यात,” असे सांगून त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी गावचे मुख्य मानकरी शांताराम गावडे यांनी सीताराम गावडे हे आमच्या गावचे भूषण आहेत. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचा, अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ गावाला व समाजाला कायम मिळावा,” अशी भावना व्यक्त केली. गावच्या मातीतून घडलेला पत्रकार राष्ट्रीय-राज्यस्तरावर आपली ओळख निर्माण करतो आणि त्याचा सन्मान पुन्हा गावातच होतो, ही बाब निगुडे गावासाठी अभिमानास्पद ठरली आहे.










