
सावंतवाडी : माणुसकीचा ओलावा हरवत चाललेल्या काळात, सावंतवाडीमध्ये एका निराधार महिलेला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. गेल्या ३० वर्षांपासून शहरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती परवीन अझरुद्दीन शेख (वय ५५) यांना 'जीवन आनंद' आश्रमाच्या रूपाने हक्काची मायेची सावली मिळाली आहे.
मूळच्या उडपी येथील असलेल्या परवीन शेख आपल्या पतीसोबत कामासाठी सावंतवाडीत स्थायिक झाल्या होत्या. मात्र, गेल्यावर्षी पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मूल-बाळ नसल्याने त्या एकाकी पडल्या. उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत असतानाच त्यांना आजाराने गाठले. आजारपणामुळे काम सुटले आणि घराचे भाडे थकल्याने अखेर त्यांना राहती खोली सोडावी लागली. हतबल झालेल्या परवीन यांनी गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर आणि दुकानाच्या आडोशाला आपले दिवस काढले. शेख यांच्या या दयनीय अवस्थेची माहिती मिळताच नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी तातडीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला.
प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे आणि समीरा खलील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परवीन यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, त्यांना ताप आला होता. संस्थेच्या महिला सदस्यांनी त्यांना सावरले. तर नगरसेवक देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ज्योती दुधवडकर यांच्या सहकार्याने परवीन शेख यांना पुढील आयुष्यासाठी अणाव येथील 'जीवन आनंद' आश्रम येथे दाखल करण्यात आले.










