झाराप -पत्रादेवी महामार्गावरील खड्डे 8 दिवसात भरणार !

महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता साळुंखेंचं आश्वासन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 21, 2024 11:44 AM
views 134  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी महामार्गावरील मळगाव येथे महामार्ग तसेच लगतच्या सर्विस रोडवर पडलेले सर्व खड्डे सिमेंट काँक्रीटने आठ दिवसात भरण्यात येतील असं आश्वासन महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता श्री.साळुंखे यांनी दिले. मळगाव येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची त्यांनी पाहणी केली.


झाराप पत्रादेवी महामार्गावर मळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना दररोज अनेक अपघात होत आहेत. तर अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी सभापती राजू परब तसेच मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता साळुंखे यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बोलवून घेतले. मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथील सर्कल तसेच कुंभारवाडी लगतचे सर्कल व सर्विस रोड येथे पडलेले भले मोठे खड्डे व त्यातून कसरत करत जाणारी वाहने यांची प्रत्यक्ष पाहणे यावेळी अधिकाऱ्यांनी केली. यावेळी माजी सरप सभापती राजू परब यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गेले अनेक दिवस याबाबत आपण पाठपुरावा करत असून आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.गणेशोत्सव तोंडावर आला असून याच खड्ड्यांमधून गणपती घेऊन जायचे का असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.यावेळी महामार्गाच्या कॉंक्रिटीकरांचे काम मंजूर झाले असून त्याची वर्क ऑर्डर न झाल्याने काम सुरू करता आले नाही अशी सारासारव अभियंता साळुंखे यांनी करीत वरिष्ठांकडे बोट दाखवले. यावेळी सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी थेट रत्नागिरी येथील मुख्य कार्यकारी अभियंतांना फोन लावत याबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिले खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजवून देण्यात येतील. आठ दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन साळुंखे यांनी दिले. तसेच रस्त्यावर व रस्त्यालगत जमा झालेली खडी कामगार लावून बाजूला करण्यात येईल व वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर महामार्गाचे मंजूर झालेले काम देखील सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी माजी सभापती राजू परब, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, शाखा अभियंता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अनुजा खडपकर,दीपक जोशी, साईश केरकर, सुरज राऊळ यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.