
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज, अर्जांची छाननी प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. या छाननी प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, "कोणाचा अर्ज बाद होणार आणि कोणाचा टिकणार?" या चिंतेने उमेदवारांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत.
तांत्रिक चुकांचे टेन्शन
निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय दिग्गजांपासून ते नवख्या उमेदवारांपर्यंत सर्वांचीच आज धाकधूक वाढली आहे. अर्जातील तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता किंवा प्रतिज्ञापत्रातील माहिती यावरून प्रतिस्पर्धी उमेदवार आज काय हरकत घेणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विशेषतः जात पडताळणी प्रमाणपत्र आणि थकबाकी नसल्याचे दाखले यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अर्ज छाननीनंतरच खऱ्या अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर पुढील टप्पा हा अर्ज माघारीचा असणार आहे. मात्र, सध्या तरी 'छाननी'च्या या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ की नाही, याच चिंतेत सर्व उमेदवार आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते दिसत आहेत.










